Download App

अहमदनगरमध्ये गोपीनाथ गड उभारणार; महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंची घोषणा

नाशिक : नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे आज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी एक महत्वाची घोषणा केली. अहमदनगरमध्ये देखील गोपीनाथ गड उभारणार असे प्रतिपादन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आज नाशिकमधील नांदूर शिंगोटे येथे पार पडला आहे. या कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), भाजपनेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक आमदार, नेतेमंडळी, तसेच पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते.

यावेळी विखे यांनी सर्वप्रथम गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केले. पुढे बोलताना विखे म्हणाले, मुंडे हे एक वादळ होत. ते आपण विधानसभेत पाहिलं तसेच लोकांच्या प्रश्नांसाठी हे वादळ आपण रस्त्यावर देखील पाहिला. असा नेता पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही, अशा शब्दात विखे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा गुणगौरव केला.

पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये गोपीनाथ गड तयार केला आहे. पण आज मी नगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आज घोषणा करतो की अहमदनगरमध्ये मी गोपीनाथ गड उभारणार असं विखे म्हणाले. कारण ते आपले नेते होते. बाळासाहेब विखे पाटील यांचे आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे जुने नाते आहे. यामुळे हे आपलं दायित्व आहे. आजच्या या कार्यक्रमात मी सांगू इच्छितो येथे उभारण्यात आलेल्या गडापेक्षा मोठा गोपीनाथ गड मी अहमदनगर जिल्ह्यात उभारणार असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.

कोण आहे अनिल जयसिंघानी?

मुंडेंच्या कार्यक्रमाला फडणवीसांची अनुपस्थिती
नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे याठिकाणी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडला आहे. या कार्यक्रमाला राज्यासह केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगु लागली आहे.

Tags

follow us