मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) उद्या जळगाव ( Jalagaon ) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, या दौऱ्यात त्यांच्या हस्ते जळगाव आणि चोपडा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन होणार आहे. या पुलाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजुरी देण्यात आली होती. आता त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. या विषयावरून गुलाबराव पाटलांनी ( Gulabrao Patil ) उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. यावेळी ते जळगाव येथे बोलत होते.
हा पूल व्हावा म्हणून आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला, आता त्याला एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला असं सांगत गुलाबराव पाटील यांनी पुलाच्या कामाचे श्रेय उद्धव ठाकरेंना नाकारलं, श्रेय सगळ्यांचं आहे असंही त्यांनी सांगितलं. यावेळी या पुलाचे श्रेय कुणाला द्याल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर प्यार का वादा फिफ्टी-फिफ्टी असे म्हणत उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला.
यावेळी त्यांनी कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला, या विषयावर गुलाबराव पाटील यांनी जळगावात प्रतिक्रिया दिली. मनसेने मनसे पाठिंबा दिला, असं मिश्किल उत्तर त्यांनी दिले. तसेच मनसेच्या मनाला जे वाटलं ते केलं, असे ते म्हणाले.
दरम्यान भीमाशंकर मंदिर वादावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. देव सगळीकडे आहे, दगडात देखील देव आहे. टीका करणं फार सोपं आहे. आता फक्त राजकारण देवावर करायचं असेल तर त्यांनी ते करत राहावं. राजभवनवर शपथविधी वेळी राष्ट्रवादीची व अजितदादांची व्यवस्था चांगली ठेवली होती. अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना चिमटा काढला. तसेच कुणी म्हटल्याने तो दावा सत्य होतो असं नाही. देव ज्या ठिकाणी आहे, लोक त्याचं ठिकाणी मानतात.
जिथं देवाला महत्त्व दिलं गेलं आहे. तिथंच ते शोभतात, प्रभू रामचंद्र अयोध्येत शोभतात. कुणी काही म्हणत असलं तरी त्याला महत्त्व नाही, अशा शब्दात त्यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.