Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून नफा कमवता येतो (Share Market Fraud) मात्र त्यासाठी देखील मार्केटचे ज्ञान आवश्यक असते. मात्र ज्यांना मार्केटचे ज्ञान नाही अशांना अधिक परताव्याचे आमिष देऊन गुंतवणूक करवून घेत कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आले. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक रक्कम मिळण्याच्या आशेने नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली.
विशेष म्हणजे खेडोपाडी शेअर मार्केटचे दुकान सुरु करून कोट्यवधींच्या गुंतवणूक केल्या जाऊ लागल्या. मात्र हळूहळू गुंतवणूक करून घेणारे फरार होऊ लागले व शेअर मार्केटच्या नावाखाली सुरु असलेला हा मोठा घोटाळा उघड होऊ लागला. अधिक परताव्याच्या अमिषापायी घर जमीन शेती सोने गहाण ठेवत पैसे गुंतवले मात्र फसवणूक झाल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली. दरम्यान पोलीस प्रशासनाने फसवणूक करणाऱ्या अनेक भामट्यांना गजाआड केले आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे? हेच आपण जाणून घेऊ..
शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मागील चार वर्षांपासून शेअर मार्केटचा हा काळा बाजार शेवगाव तालुक्यातील खेडोपाडी सुरू होता. काही ट्रेडर आणि एजंट यांनी लोकांना भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणूक करतो असे सांगत घेतले. महिन्याला 12 ते 15 टक्के परतावा देतो अशी बतावणी करत शेवगाव तालुक्यात 200 पेक्षा जास्त एजंट तयार झाले होते.
अमेरिकेचा एकच निर्णय अन् शेअर मार्केट धडाम्; सेन्सेक्स आपटला, गुंतवणूकदारांत धास्ती
या एजंट्सने दाखवलेल्या आमिषाला बळी पडून लोकांनी कोट्यवधी रुपये जमा केले होते. या एजंट्सने सुरुवातीला लोकांना परतावा दिला. नंतर मात्र हेच एजंट्स आपल्या संपूर्ण कुटुंबासह गावातून पळून गेले. या तालुक्यातील 110 खेडेगावातून करोडोची गुंतवणूक करून घेत अनेक एजंट आता फरार झाले आहेत. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र हळूहळू फसवणूक झालेले गुंतवणूकदार यांनी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यास सुरुवात केली. कोट्यवधींची फसवणूक समोर येताच पोलीस प्रशासनाने देखील पाऊले उचलत अनेक फरार भामट्यांना गजाआड केले आहे.
घरबसल्या मिळणाऱ्या परतव्यातून अनेक लोक याकडे आकर्षित झाले. शेतातील धनधान्य, दागदागिने, विविध बँक, पतसंस्था मधील ठेव पावत्या मोडल्या. अनेकांनी शेतात काय उत्पन्न नाही, म्हणतं वावर विकले, काहींनी शेत गहाण ठेवलं तर काहींनी प्लॉट विकले. यामध्ये तालुक्यातील शेत कामगार, वीट कामगार, शेतकरी, शिक्षक, कामगार, महिला, बचतगटांतील सदस्य, नोकरदार यांच्यासह मोठमोठे व्यापारी तसेच काही नेतेमंडळीनीं गुंतवणूक केली. सुरुवातीला परतावा दिला व त्यानंतर परतावा येणे बंद झाले. काही दिवसानंतर हे भामटे आपल्या परिवारासह गावातूनच फरार झाले व हा सगळा घोटाळा बाहेर आला.
शेअर मार्केट ट्रेडिंग नावाखाली अनेकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारा बिगबूल साईनाथ कवडे यास अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात येथून ताब्यात घेतले आहे. चार वर्षांपूर्वी साईनाथ कवडे याने शेवगाव तालुक्यातील रावतळे कुरुडगाव येथील शेतात शेअर मार्केट ट्रेडिंग कार्यालय सुरु केले होते. यावेळी केलेल्या गुंतवणुकीवर १२ ते २० टक्के मासिक परतावा दिला. त्याच्या या अमिषाला बळी पडून अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मात्र काही दिवसांनी हा परतावा बंद झाला. तालुक्यात अनेक फसवुणकीचे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होताच साई कवडे हा अनेकांचे पैसे हडप करुन फरार झाला. अखेर अनेक दिवसांच्या कालावधीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
शेवगाव तालुक्यातील गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा साई कवडे लोकांच्या पैशातून एक लक्झरियस आयुष्य जगात होता. त्याच्याकडे महागड्या आलिशान गाड्या, घड्याळ, मोबाईल, त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली खाजगी सुरक्षा रक्षक टोळी, एका मागे एक दहा ते पंधरा गाड्यांचा ताफा, जसे की सिनेमात दिसते तसेच काहीसे चित्र हे तालुक्यात दिसत होते. यालाच भाळून अनेकांनी पैसे गुंतवले व यातच ते फसले. अनेक भामटे गजाआड झाले आहे मात्र नागरिकांची झालेली आर्थिक फसवणूक व गुंतवलेली रक्कम कधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच जादा परताव्याच्या अमिषापोटी नागरिकांनी देखील गुंतवणूक करू नये प्रत्येक गोष्टीची माहिती घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.