Download App

जाहिरातींसाठी उधळपट्टी करता तेच पैसे शेतकऱ्यांना.. ; जाहिरातबाजीवर अजितदादांचा संताप

Ajit Pawar : महागाई प्रचंड वाढली आहे पण याचे उत्तर ना केंद्र सरकार देतयं ना राज्य सरकार बेरोजगारीही वाढली आहे पण, सरकार मात्र जाहिरातबाजी करत आहे. जाहिरातबाजीसाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. सरकारचे कामच दिसत नाही म्हणून त्यांना जाहिरातबाजी करावी लागत आहे. हे जाहिरातीचे पैसे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिले असते तर आम्हीही कौतुक केले असते, अशा परिस्थितीत तुम्ही जाहिरातीवर उधळपट्टी करणार असाल तर हा कोणता न्याय आहे, असा सवाल उपस्थित करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांना दहा हजार सायकलींचे मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम आज कर्जतमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते.

वाचा : तुम्ही रोहितला आमदार केलं, त्याने माझ्यापेक्षाही जास्त काम केलं; अजितदादांनी दिली कौतुकाची थाप 

पवार म्हणाले, राज्यात महागाई, बरोजगारीचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. अवकाळी पावसाच्या संकटाने तर शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. कांदा पिकवणाऱ्यांच्या डोळ्यात तर अक्षरशः पाणी आले आहे. आम्ही विधानसभेत हे प्रश्न मांडले आंदोलने केली. पण, सरकारकडून सुधारणा होत नाहीत. कांद्याला प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान दिले पण त्याने काय होणार ?  आम्ही पाचशे रुपये अनुदानाची मागणी केली होती.

साखरेवरील निर्य़ातीबाबत काहीतरी ठोस धोरण घ्या अशी मागणी आम्ही केली होती. ज्या देशात साखरेला चांगला भाव मिळत आहे तिथे साखर निर्यात करण्याला काय हरकत आहे. त्यातून शेतकऱ्यांनाही दोन पैसे जास्त मिळतील. मात्र, परदेशात साखर का पाठवली जात नाही. तिथे जास्त भाव मिळतील असतील तर त्या देशात साखर निर्यात करायला काहीच हरकत नाही, असे पवार यांनी सांगितले.

Tags

follow us