मुकुंद भालेराव
Market Committee Elections : नगर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Market Committee Elections) रणधुमाळी जोरात सुरू आहे. काल गुरुवारी अर्ज माघारीचा टप्पा संपला. अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप तर काही ठिकाणी भाजप, काँग्रेस, मनसे अशी अशक्य वाटणारी युतीही झाली आहे. ग्रामीण भागाच्या अर्थकारणात बाजार समित्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे या समित्या ताब्यात घेण्यासाठी राजकीय नेते जोर लावतात. आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना निवडून आणून समितीची सत्तासूत्रे आपल्याच हातात राहतील याची काळजी घेतली जाते.
आताही नगर जिल्ह्यात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे पॅनल तयार आहेत. प्रचारही सुरू होईल. या पॅनलच्या माध्यमातून तालुक्यातील नेत्यांचीच एक प्रकारे परीक्षा होणार आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यानंतर पुढील वर्षात लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकाही होणार आहे. या मोठ्या निवडणुकांआधी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका राजकीय पक्षांसाठी लिटमस टेस्ट ठरतील, यात शंका नाही.
नगर-राहुरीत कर्डिलेंना विखेंचे बळ
राहुरी बाजार समितीत यंदा माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या पॅनेलमध्ये लढत होणार आहे. कर्डिलेंना विखे गटाचीही साथ मिळाल्याने त्यांचे बळ वाढले आहे. त्यामुळे येथील लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. नगर बाजार समितीत शिवाजी कर्डिलेंविरोधात तनपुरे हे प्रचार करत आहेत. तर कर्डिले हे विखेंच्या मदतीने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती कशा पद्धतीने ताब्यात घेता येईल, यासाठी राजकीय डावपेच टाकत आहेत. दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
‘आधी स्वतःच्या पाठीमागे किती आमदार हे पाहा’; देसाईंनी चव्हाणांना सुनावलं
नगर बाजार समितीत कर्डिले गटाला बाहेर काढण्यासाठी येथील स्थानिक नेत्यांच्या महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. या निवडणुकीत तर कर्डिले यांचे पुतणे रोहिदास कर्डिलेच त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, प्रा. शशिकांत गाडे, शरद झोडगे यांनीही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. विरोधक एकवटले असले तरी कर्डिलेंना मिळत असलेली विखेंची साथ ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे. काही दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता विखेंनी त्यांचा विरोध मवाळ केल्याचे दिसत आहे.
दक्षिणेत भाजपला रोखण्याचे राजकारण
जिल्ह्यातील दक्षिण भागातील बाजार समित्यांत फक्त भाजपला रोखण्याच्या उद्देशाने अशक्य वाटतील अशी हातमिळवणी झाली आहे. पारनेरमध्ये माजी आमदार विजय औटी आणि आमदार निलेश लंके यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. तरी देखील खासदार विखे यांना शह देण्यासाठी हे दोघे जुना वाद विसरून एकत्र आले आहेत. समितीतील 18 जागांची तीन पक्षात वाटणी करत त्यांनी पॅनल तयार केले आहे. येथे भाजपचेही पॅनल असून माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरेंची विखेंना साथ मिळत आहे. खा. डॉ सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्वतंत्र पॅनल उभा केला आहे.
शेवगाव बाजार समितीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वात ज्ञानेश्वर शेतकरी विकास मंडळ तर भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वात आदिनाथ शेतकरी मंडळ यांच्यातच खरी लढत होणार आहे. श्रीगोंदा बाजार समितीत मात्र राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. येथे भाजप आमदार बबनराव पाचपुते यांची डोकेदुखी वाढली आहे. येथेही त्यांचे पुतणे विरोधात उतरले आहेत. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरील राजकारण जोरात सुरू आहे. काँग्रेसचे राजेंद्र नागवडे, भाजपचे बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस एकत्र आले आहेत. या मंडळींच्या विरोधात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार, बाळासाहेब नाहाटा यांच्या पॅनलमध्ये लढत होत आहे.
ढाकणेंची खेळी, संचालक थेट घरीच
पाथर्डी बाजार समितीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे आणि भाजप आमदार मोनिका राजळे यांच्यात लढत होत आहे. बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीतील पराभवाची काही प्रमाणात का होईना परतफेड करण्याची संधी ढाकणे यांना मिळाली आहे. ढाकणे यांनी यावेळी येथे एक खास खेळी खेळली आहे. जुन्या संचालकांना डच्चू देत सर्वच जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. आता त्यांची ही खेळी कितपत यशस्वी ठरते हे निवडणुकीच्या निकालानंतरच समोर येईल. पंधरा संचालकांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्या या डावपेचाची जोरदार चर्चा सुरू आहे.
कर्जत बाजार समितीत रोहित पवारांना धक्का
कर्जत-जामखेड बाजार समितीची निवडणूक जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात चर्चेत आहेत. आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांना धक्का देत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांना भाजपच्या पॅनलमधून उमेदवारी दिली आहे. या प्रकाराची दखल घेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी तापकीर यांचा पक्षातून हकालपट्टी केली आहे. कर्जत समितीची निवडणूक तिरंगी होईल असे वाटत होते. मात्र, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे समर्थक अंबादास पिसाळ यांची नाराजी दूर करण्यात शिंदेंना यश आले. त्यामुळे पिसाळ यांची तिसरी आघाडी प्रत्यक्षात न येता त्यांना शिंदे यांच्यासोबत जावे लागले. याआधी नगरपंचायतीच्या निवडणुकीत काही जागा बिनविरोध करत आ. रोहित पवार यांनी आ. शिंदे यांना धक्का दिला होता. या निवडणुकीत त्याची परतफेड करत शिंदे यांनी पवारांना धक्का दिला आहे.
कोपरगावात भाजप राष्ट्रवादीचा हातात हात
उत्तरेतील अकोले बाजार समिती वगळता अन्य बाजार समित्यांमध्ये माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यातील संघर्ष दिसणार आहे. राहाता बाजार समितीत विखे पाटील यांच्या गटाच्या हमाल मापाडी मतदारसंघातील एक व व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. मागील पंधरा वर्षांपासून कोपरगाव समितीची निवडणूक बिनविरोध होत होती. यावेळी मात्र ही परंपरा खंडित झाली आहे. या बाजार समितीत यंदा निवडणूक होणार असून भाजप, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील एक फुटीर गट बरोबर आले आहेत. आमदार आशुतोष काळे, भाजप नेत्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे हे विरोधक आहेत. मात्र या निवडणुकीत या नेत्यांच्या नेतृत्वातील पॅनल एकत्र दिसतील. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांना शह देण्यासाठी विखे-ससाणे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. कानडे विरुद्ध विख-ससाणे-मुरकुटे असा सामना येथे रंगणार आहे.
नेवाशात गडाखांची दमदार बॅटिंग
नेवासा बाजार समितीच्या निवडणुकीत यंदाही आमदार शंकरराव गडाख विरुद्ध माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटात लढत होत आहे. या निवडणुकीत मुरकुटे यांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांची साथ मिळाली आहे. मात्र, या गडाख विरोधी पॅनलमधून ऐनवेळी मातब्बर उमेदवारांनी माघार घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हमाल मापाडी मतदारसंघात एक जागा बिनविरोध करत गडाख गटाने दमदार वाटचाल सुरू केली आहे. तर दुसरीकडे पाहिजे तसे उमेदवार न मिळाल्याने नवखे उमेदवार देण्याची नामुष्की गडाख विरोधी गटावर आली आहे.
आजी-माजी आमदारांचे पॅनल तयार
अकोले बाजार समितीची निवडणूक माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी हातात घेतली आहे. त्यांना आमदार किरण लहामटे यांच्याकडून जोरदार टक्कर मिळत आहे. लहामटे यांच्या नेतृत्वात शेतकरी समृद्धी मंडळ आणि पिचड यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास मंडळात सरळ सरळ लढत होत आहे. या लढतीत सध्या तरी माजी आमदार वैभव पिचड यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. त्यांच्या नेतृत्वातील मंडळाने तीन जागा बिनविरोध जिंकत दमदार सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे लहामटे यांच्या समृद्धी मंडळाला तीन ठिकाणी उमेदवारही मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी पंधरा उमेदवारांची घोषणा केली आहे.