Download App

‘इंदुरीकरांवरील खटला मागे घेण्यासाठी दबाव’; ‘अंनिस’च्या महिला पदाधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांनी अडचणीच्या भोवऱ्यात सापडतात. यातच त्यांच्यावर अशाच एका वक्तव्यावरून खटला सुरु आहे. नुकतेच इंदुरीकर महाराजांवरील खटला सुरू ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सरचिटणीस रंजना गवांदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहे. इंदुरीकर महाराज यांच्यावरील खटला मागे घ्यावा यासाठी आमच्यावर दबाव होता तसेच आमच्यावर हल्ला होईल अशी शक्यताही पोलिसांनी आम्हाला कळविली होती, असा खळबळजनक दावा अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या राज्य सरचिटणीस रंजना गवांदे यांनी केला.

इंदुरीकर महाराजांना दिलासा नाहीच! पुत्र प्राप्ती वक्तव्य प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचाही दणका

या प्रकाराची माहिती गवांदे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. तसेच त्यांनी इंदुरीकर महाराज आणि संभाजी भिडे यांच्यावर जोरदार टीका केली. आमचा विरोध व्यक्तीला नाही तर प्रवृत्तीला आहे. अशास्त्रीय वक्तव्ये करून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी आणि महिलांबाबत भेदाभेद करणारी असल्याने संभाजी भिडे आणि इंदोरीकर यांची प्रवृत्ती एकच आहे, असे गवांदे म्हणाल्या.

किर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदुरीकर महाराजांनी लिंगनिदान दाव्यासंबंधी काही वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यासंबंधी त्यांच्यावर संगमने येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात सुरू असलेला खटला सुरुच ठेवावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील इंदोरीकर महाराज यांची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे, या निकालाचे आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया रंजना पगार-गवांदे यांनी दिली.

सम आणि विषम तारखेला स्त्रीशी संग केला; तर अनुक्रमे मुलगा व मुलगी होते, असे अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निषेध देखील केला होता. त्यानंतर संगमनेर येथील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. इंदुरीकर यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने त्यांचे आव्हान नामंजूर करत खटला सुरू ठेवण्याचे आदेश दिले.

Tags

follow us