Mahadeo Jankar : एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि भाजपमध्ये आता खटके उडू लागले आहेत. जानकर आता भाजपवर उघड नाराजी व्यक्त करू लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत. जानकर नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपाच्या राजकारणावर घणाघाती टीका केली.
Letsupp Special : ‘माझं तिकीट फायनल, भाजपाला मस्का लावणार नाही’; जानकरांनी फुंकलं रणशिंग!
नगरमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, फडणवीस म्हणाले होते, एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपबरोबर आल्याने फायदा होईल. पण, भाजप एवढा मोठा पक्ष होता तर अजित पवार यांना फोडण्याची गरज नव्हती. भाजपवर टीका करण्याइतका माझा पक्ष मोठा नाही. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. माझा पक्ष वाढविण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.
ते पुढे म्हणाले, मी गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच भाजपबरोबर गेलो होतो. मुंडे हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. पण, आताचे नेते स्वतःला त्यांच्यापेक्षा जास्त हुशार समजतात. म्हणून कदाचित त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाची गरज वाटत नसेल. त्यामुळे आम्हीही आता भाजपाच्या मागे लागणार नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजप नेत्यांवर नाराजी व्यक्त केली.
आजही माझे दोन आमदार हे रासपाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. मी आज जो विधानपरिषदेत आमदार आहे तो माझ्या पक्षाच्या चिन्हावर आहे. भाजपाच्या चिन्हावर लढलो नाही. आमच्याच पक्षात राहुल कुल आमदार होते त्यांनी ऐनवेळी एबी फॉर्म जोडला म्हणून ते भाजपाचे झाले. आता आमचे दोन आमदार आहेत. त्यांच्या पक्ष चिन्हावर लढण्याचा काहीच प्रश्न येत नाही.’
‘सध्या मी परभणी, बारामती, माढा आणि मिर्झापूर या चार लोकसभा मतदारसंघांतून तयारी करत आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर मतदारसंघातून माझं तिकीट जवळपास फायनल झालं आहे. महाराष्ट्रातून परभणी की माढा कुठून लढायचं हे अद्याप निश्चित झालेले नाही.’ कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करणार का, या प्रश्नावर जानकर म्हणाले, ‘आम्हाला अद्याप कुणाकडूनही ऑफर आलेली नाही. त्याबद्दलही काहीच चर्चा झालेली नाही. जुन्या मित्रांनी आम्हाला ऑफर दिली नसली तरी नवीन मित्रांचीही ऑफर आली पाहिजे. ऑफर आल्यानंतर यावर सविस्तर चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ’, असे जानकर म्हणाले.