Download App

‘बीआरएस’ला नगरी झटका! घनश्याम शेलारांना पक्षात घेत काँग्रेसची बेरीज; अजितदादांनाही धक्का?

Ahmednagar Politics : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भारत राष्ट्र समितीच्या मोटारीला महाराष्ट्रात ब्रेक लागला आहे. राज्यात अनेक शिलेदारांनी या पक्षाची साथ सोडली आहे. आता आणखी एक मोठा धक्का अहमदनगर जिल्ह्यात बसला आहे. काही दिवसांपूर्वी थेट हैदराबादेत जाऊन बीआरएसचा झेंडा हाती घेणारे वजनदार नेते घनश्याम शेलार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शेलार यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे आता ऐन लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी श्रीगोंदा येथे संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास शेलार यांनी आपली उपस्थिती दर्शविली. या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये धक्कादायक निकाल समोर आले होते. यातच के. चंद्रशेखर राव यांना तेलंगानामध्येच सत्ता गमवावी लागली. यामुळे महाराष्ट्रातील नेते देखील अस्वस्थ होते. त्यामुळे येणाऱ्या काळातील निवडणुकीची गणितं बिघडण्याआधीच राजकीय नेत्यांकडून हालचाली सुरू होत्या.

Congress Manifesto : महिलांना वार्षिक 1 लाख, 30 लाख नोकऱ्या; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?

यातच बीआरएसला नगर जिल्ह्यातून धक्का बसला. घनश्याम शेलार यांनी थोरात यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान काही दिवसांपूर्वीच श्रीगोंद्यात काँग्रेसमध्ये असलेले नागवडे दाम्पत्य यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला. यामुळे श्रीगोंद्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले होते. पक्षप्रवेशाने पुन्हा एकदा काँग्रेसला बळकटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसची खेळी महायुती पुढे आव्हान

यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असल्याने मोठ्या राजकीय खेळी राजकीय पक्षांकडून खेळल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील तत्कालीन काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांनी काँग्रेसची साथ सोडत अजित पवार गटात प्रवेश केला होता. विधानसभेच्या अनुषंगाने त्यांचा हा पक्ष प्रवेश मानला जात आहे. मात्र यामुळे श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले होते. येणाऱ्या निवडणुका पाहता काँग्रेसने नवी खेळी करत बीआरएसमध्ये असलेले घनश्याम शेलार यांना आपल्याकडे घेत महायुती पुढे एक नवे आव्हान उभे केले आहे.

Ahmednagar : सुजय विखेंसाठी नगरकरांचं ठरलंय; भाजप नेत्याच्या वक्तव्याने वेगळीच चर्चा

घनश्याम शेलारांचा प्रवेश, काँग्रेसने केली मोठी बेरीज 

घनश्याम शेलार हे आजवर विविध पक्ष फिरून आले आहेत. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. बीआरएसची होणारी वाताहत पाहता शेलार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेलार यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मध्ये कडवी झुंज देखील दिली होती. अवघ्या साडेसातशे मतांनी शेलार यांचा पराभव झाला होता. श्रीगोंदा तालुक्यातील शेलार एक प्रबळ नेते मानले जात असून काँग्रेसमधील त्यांच्या पक्षप्रवेशाने आता डोकेदुखी वाढणार हे मात्र नक्की.

follow us