राहुरी : विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. स्टार प्रचारक आणि नेत्यांच्या सभा होत आहेत. तर दुसरीकडे उमेदवार देखील थेट मतदारांच्या भेटी घेत आहेत. राहुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. तालुक्यातील वावरथ जांभळी परिसरातील नागरिकांची दळणवळण यांची सोय व्हावी यासाठी पुलाचा प्रलंबित प्रश्न आमदार होताच प्राधान्याने मार्गी लावणार आहे, अशी ग्वाही शिवाजी कर्डिले यांनी दिली.
या भागातील नागरिकांचा राहुरीशी संपर्क होण्यासाठी स्वखर्चातून दळणवळणासाठी बोट उपलब्ध करून दिली. त्यानंतर प्रशासनाकडे पाठपुरावा करत 25 लाखांची अत्याधुनिक बोट देण्याचे काम केले. 2019 ला आमदार न झाल्यामुळे विकासाची कामे होऊ शकली नाहीत. आदिवासी, धनगर समाज तांडा आणि वस्त्यांवर राहतो. या समाजाचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचे काम केले आहे. भावनेचे राजकारण संपले असून आता अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्याला विकासाची कामे मार्गी लावायची आहेत, असे कर्डिले यावेळी म्हणाले.
कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील वावरथ, जांभळी, जांबुळबन, शेरी चिखलठाण, म्हैसगाव, कोळेवाडी, दरडगावथडी, गाडकवाडी, ताहराबाद, बेलकरवाडी, वाबळेवाडी, वरशिंदे आदी गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी ठिकठिकाणी कर्डिले यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. म्हैसगाव येथील नागरिकांच्यावतीने बाईक रॅली काढण्यात आली व कर्डिले यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली.
ही निकालानंतरची विजयी सभाच…राहुरीत शिवाजीराव कर्डिले यांचं भव्य शक्तीप्रदर्शन
या प्रचार दौऱ्यात देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे अध्यक्ष सत्यजित कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, अण्णासाहेब बाचकर, अविनाश बाचकर, दादा पाटील बाचकर, शिवाजी सागर, गोपीनाथ दुधाडे, पांडुरंग शेलार, भीमराव काकडे, बाळासाहेब काकडे, सारंग काकडे, अरुण पवार, दत्तात्रय काकडे, बापू जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कर्डिले पुढे म्हणाले, जांभूळबन, जांभळी वावरथ या आदिवासी गावांमध्ये कधीही आमदार, खासदार, मंत्री, प्रशासन आले नव्हते. मात्र मी 2009 मध्ये आमदार झालो आणि या भागाचे प्रश्न समजून घेण्यासाठी आलो. तेव्हापासून आतापर्यंत या गावकऱ्यांशी ऋणानुबंध कायम ठेवले आहेत. शासनाच्या विविध योजना गावापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ढवळपुरी ते जांभूळबन रस्त्याचे काम मार्गी लावले. विजेचा प्रश्न गंभीर होता तो देखील मार्गी लावण्यात आल्याचे कर्डिले यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. वावरथ जांभळी, जांभूळबन ही दुर्लक्षित गावे होती. या गावांकडे स्वातंत्र्योत्तर काळात कुणीही लक्ष दिलं नाही. मात्र माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे राहुरी तालुक्याचे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा गावामध्ये आले आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध योजना गावापर्यंत घेऊन आले. त्यामुळे गावाला गावपण मिळालं. राहुरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी (प्राजक्त तनपुरे) आदिवासी खात्याचे मंत्री असताना देखील आदिवासी समाजाचे प्रश्न मार्गी लावू शकले नाहीत. त्यांनी केलेल्या विकासकामांची यादी वाचून दाखवावी असे आव्हान अविनाश बाचकर यांनी दिले.
राष्ट्रवादीला भगदाड! कर्डिलेंच्या खेळीने राहुरीत निकाल बदलणार का? मोठ्या नेत्याच्या हाती ‘कमळ’
तनपुरे कुटुंबियांनी सत्तेच्या माध्यमातून राहुरी तालुक्याचे वाटोळे केले. सहकारी संस्था बंद पाडण्याचे काम केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता राहुरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठीची जबाबदारी सत्यजित कदम यांच्यावर देतो. त्यांना जी काही मदत लागेल ती केली जाईल. शेरी चिखलठाणा ग्रामस्थांनी मला 21 हजार रुपयाची निवडणुकीसाठी मदत केली ही मला 21 कोटी सारखी आहे, असे कौतुकोद्गार कर्डिले यांनी काढले.
राहुरी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षांमध्ये कुठलेही विकासाचे भरीव काम केलेले दिसत नाही. मात्र गावोगावी भाजपच्यावतीने करण्यात आलेल्या विकासकामांची गावकरी यादीच वाचून दाखवत आहेत. तालुक्यातील युवकांनी निवडणूक हाती घेतली असल्यामुळे परिवर्तन अटळ आहे. कुठल्याही भूलथापांना व अफवांवर विश्वास न ठेवता भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना मतदान करावे असे आवाहन देवळाली प्रवारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केले.