Download App

अवघ्या तीन तासांच्या कार्यक्रमासाठी १५० कोटींचा मंडप; चौंडीतील कार्यक्रमाच्या खर्चाची चर्चा, सरकारचंही स्पष्टीकरण

नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Ahilyanagar News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या‎ जयंतीनिमित्त नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. २९ एप्रिल‎ रोजी होत असलेली ही बैठक मात्र वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. येथे तात्पुरती सुविधा निर्माण ‎करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने‎ तब्बल १५० कोटींचा खर्च होणार असून याबाबतची निविदा जाहीर करण्यात आली. केवळ काही तासांच्या या मंत्री मंडळासाठी ‎एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी का खर्च करायचा‎ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.‎ यावरून आता विरोधक देखील आक्रमक झाले आहे.

मध्य प्रदेश‎ सरकारने अहिल्यादेवींच्या ३०० जयंतीनिमित्त महेश्वर येथे‎ मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्याच धर्तीवर राज्यातील महायुती सरकारने चौंडीत बैठक‎ घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चौंडी येथे ‎भेट देत व्यवस्थेची पाहणी केली. येथील कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत निविदा‎ मागण्यात आल्या. या निविदा भरण्यासाठी २१ ते २३ एप्रिल हा कालावधी ‎देण्यात आला. २४ एप्रिलला सायंकाळी ६ वाजेपर्यंत ‎निविदा उघडली जाईल.‎ दरम्यान चौंडी येथे पहिल्यांदाच २९ एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी तात्पुरत्या सुविधा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे १५० कोटी रुपये खर्चाची निविदा जाहीर केली आहे.

दीडशे कोटींमध्ये काय काय सुविधा असणार? जाणून घ्या

चौंडी येथील या बैठकीसाठी १५० कोटींपैकी १०० कोटी रुपये खर्चून मंत्र्यांसाठी उन्हापासून संरक्षण देणारे ग्रीन रूम, मुख्य मंडप, स्टेज आणि प्रसाधनगृह उभारले जाणार आहेत. मंडपाच्या चारही बाजूंना बॅरिकेड्स लावले जाणार आहेत. उर्वरित ५० कोटी रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे, वातानुकूलित यंत्रणा, विद्युतीकरण, ध्वनियंत्रणा आणि अग्निशमन व्यवस्था उभारली जाईल.

शाही खर्चावरून विरोधक आक्रमक

चौंडी येथील बैठकीसाठी जो शाही खर्च करण्यात येणार आहे यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरून जोरदार निशाणा साधला आहे. राज्य आर्थिक अडचणीत असल्याचं सांगत सरकारने ज्येष्ठ नागरिक तीर्थक्षेत्र योजना बंद केली. लाडक्या बहिणींना प्रति महिना २१०० रुपये दिले नाहीत. शेतकरी कर्जमाफी केली नाही आणि चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मंडप आणि व्यवस्थेसाठी १५० कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे.

एक आठवड्यापूर्वी खा. सुनिल तटकरेंच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गेले होते त्यावेळीही हेलिपॅडसाठी दीड कोटी रुपये खर्च केले होते. जनतेला आर्थिक अडचणीत टाकून सरकारमध्ये बसलेले सत्तासूर पंचतारांकित सुविधा भोगत आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ अजून खूप लहान : बावनकुळे

या प्रकारावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. बावनकुळे यांनी एक्सवर एक पोस्टमध्ये सपकाळ यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सपकाळ अजून खूप लहान आहेत. मोठा पल्ला त्यांना गाठावा लागेल, पण त्यासाठी आधी पोरकटपणा सोडून द्यावा लागेल. झाले असे की, चौंडी येथील प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीसाठी काल दि. 21 एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगरने एक जाहिरात प्रकाशित केली. या जाहिरातीची रिलीज ऑर्डर देताना ती दीड कोटींची असल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद आहे.

‘भाजपमध्ये या’, चंद्रकांत पाटलांकडून महिनाभरात विशाल पाटलांना दुसऱ्यांदा ऑफर …कारण काय?

दोन वर्तमानपत्रात जाहीरात प्रकाशित झाली. एका वर्तमानपत्रात दोन शून्यापूर्वी असलेला टिंब अनवधानाने काढून टाकण्यात आल्याने ती 150 कोटींची दिसते. वास्तविक ही त्या वर्तमानपत्राची तांत्रिक चूक आहे. कॉमा आणि टिंब यात संबंधित वर्तमानपत्राने अनवधानाने गल्लत केल्याने असा प्रकार झाला आहे. वर्तमानपत्रांना दिलेला जाहिरातीचा रिलीज ऑर्डर किंवा संकेतस्थळावर ती बिनचूक आहे. असे असतानाही सपकाळ माध्यमांत झळकत राहण्यासाठी असा पोरकटपणा करतात तेव्हा त्यांची कीव येते. त्यांच्याबद्दल कणव व्यक्त करण्याशिवाय आणखी काही करता येईल असे वाटत नाही.

follow us