Download App

कुस्तीच्या मैदानात राजकीय डाव! रोहित पवारांची स्पर्धा बेकायदेशीर? ‘त्या’ पत्राचा इशारा काय?

आमदार रोहित पवार यांनी घेतलेली कुस्ती स्पर्धा होणारच नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे.

Ahilyanagar News : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादाचा फटका पहिलवानांना बसताना दिसतोय. रामदास तडस यांच्या संघटनेने आयोजित केलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच नगर शहरात पार पडली. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने कर्जत जामखेडमध्ये ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन मार्च महिन्यात करण्यात आले आहे. या कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आहेत.

नगर शहरात झालेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत पैलवानांवर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवत पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत-जामखेड मध्ये घेणार असल्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली होती. यानंतर आता रोहित पवार यांनी घेतलेली कुस्ती स्पर्धा होणारच नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे.

यामध्ये अजून एक धक्कादायक बाब समोर आली असून कर्जत जामखेडमध्ये होणाऱ्या कुस्ती स्पर्धेतील विजेत्या कुस्तीपटू्ंना फक्त प्रमाणपत्र मिळेल मात्र ऑलम्पिक स्पर्धेसाठी अथवा भारतीय कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये भाग घेण्यासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग होणार नाही. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळवण्यासाठी सरकारी कामकाजात कुठेही या प्रमाणपत्राचा उपयोग होणार नाही त्यामुळे ही कुस्ती स्पर्धा होणारच नाही आणि झाली तरी त्या प्रमाणपत्रांचा काही उपयोग नसेल, अशी माहिती संदीप भोंडवे यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित रंगला ‘हिंदू गर्जना चषक’ राजस्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार !

कुस्तीगीर संघाचा इशारा काय?

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या या कुस्ती स्पर्धेला आता राजकीय वळण लागलं आहे. या स्पर्धेला अप्रत्यक्ष विरोध सुरू झाला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने कुस्तीपटूंना पत्र काढून कुस्तीगीर संघाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही संस्थेच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊ नका असे आवाहन केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केले तर अशा मल्लांना 3 वर्षांसाठी नोंदणी रद्द करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

कुस्तीगीर संघाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही संघटनेला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार नाही असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. अशा स्पर्धेत सहभागी झालात तर संबंधित मल्लांच्या तीन वर्षांसाठी कुस्तीगीर संघात नोंदणी केली जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

follow us