Sharad Pawar : मी आज येथे कुणावर टीका कररण्यासाठी नाही तर तुमची जाहीर माफी मागण्यासाठी आलो आहे. राजकारणात शक्यतो माझे अंदाज कधी चुकत नाहीत. पण, येथे मात्र माझी चूक झाली. कारण, माझा जो अंदाज होतो त्यावर तुम्ही मते दिली. पण अंदाज चुकल्याने तुम्हालाही यातना झाल्या. म्हणून तुमची माफी मागणं हे माझं कर्तव्य ठरतं, अशा शब्दांत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवला येथे आयोजित जाहीर सभेत मतदारांची माफी मागितली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानंतर उभी फूट पडली. अनेक आमदार अजित पवारांच्या गटात सामील झाले. त्यानंतर पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी स्वतः पवार मैदानात उतरले असून त्यांनी राज्याचा झंझावाती दौरा सुरू केला आहे. त्यांनी पहिलीच सभा बंडखोर आमदार छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात घेतली. या सभेत त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच राज्यातील सद्य परिस्थितीवरही भाष्य केले.
शरद पवारांनी मुंडेंचं घर फोडलं नाही; हे रंग बदलणारे सरडे; भुजबळांच्या टीकेवर आव्हाडांचा घणाघात
पवार म्हणाले, राजकारणात माझे अंदाज सहसा चुकत नाहीत. पण, येथे (येवला मतदारसंघ) मात्र चुकला. माझा जो अंदाज होता त्यावर तुम्ही मतं दिली म्हणून तुमची माफी मागणं हे माझं कर्तव्य ठरतं त्यासाठीच मी येथे आलो आहे. आज मी येथे कुणावर टीका करण्यासाठी आलो नाही. आता येथून पुढे सामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेऊन राजकारण करण्याचं ठरवलं आहे, असे पवार म्हणाले.
मोदी सरकारला दिलं चॅलेंज
काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्षावर आरोप केले होते. त्यानंतर मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. त्यांनी जे आरोप केले. मग ते कोणत्या प्रकारचे असतील किंवा भ्रष्टाचाराचे असतील. आता त्यांना माझं इतकंच सांगणं आहे की जर कुणी खरंच भ्रष्टाचारात सामील आहे असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी सगळ्या यंत्रणा वापराव्यात आणि जे कुणी भ्रष्टाचारी असतील त्यांना शिक्षा करावी, असा टोला पवार यांनी मोदींना लगावला.