येवला : काल येवल्यात येऊन तुम्ही माफी मागितली. पण कशासाठी माफी? आणि गोंदियापासून ते कोल्हापूरपर्यंत कुठे कुठे माफी मागणार आहात? 50 ठिकाणी माफी मागणार का? सुरुवात तुमच्या घरातून झाली होती. ज्यांंना तुम्ही 60-62 वर्ष संभाळलं त्यांनी पुढाकार घेतला. ते आता उपमुख्यमंत्री आहेत. असं म्हणतं मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं. ते येवला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. (minister Chhagan Bhujbal reply to NCP Chief Sharad Pawar on Apology)
राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर काल येवलामध्ये छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात शरद पवार यांची सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी येवल्यातील मतदारांची जाहीर माफी मागितली होती. राजकारणात शक्यतो माझे अंदाज कधी चुकत नाहीत. पण, येथे मात्र माझी चूक झाली. कारण, माझा जो अंदाज होतो त्यावर तुम्ही मते दिली. पण अंदाज चुकल्याने तुम्हालाही यातना झाल्या. म्हणून तुमची माफी मागणं हे माझं कर्तव्य ठरतं, अशा शब्दांत त्यांनी माफी मागितली होती. यावर भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत पवारांना सवाल केला.
शरद पवार यांच्या येवल्यातील पहिल्या सभेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘मला हेच कळालं नाही, ते इकडं का आले, तुम्ही पहिली सभा तुमच्या बारामतीत का घेतली नाही? अजित पवार तर बंडाचे प्रमुख आहेत. तेही बारामतीचे आहेत. मग तुमची पहिली सभा दिलीप वळसे यांच्या मतदारसंघात ठरली असताना ती येवला या माझ्या मतदारसंघात का घेतली? मी ओबीसी आहे म्हणून तुम्ही येथे सभा घेतली का? कदाचित त्यांना वाटलं असेल कि, हा ओबीसी नेता आहे, आपण याच्याकडे गेलं पाहिजे असं त्यांना वाटलं असेल.
भुजबळ पुढे म्हणाले की, “हे झालं कुठून? साहेब तुमच्या घरातून झालं ना? 60-62 वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं ते अजित पवार तर मुख्य आहेत. ते तर उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, ते बघा ना का आहेत. ही इतकी मंडळी का गेली याचा विचार करा. दिलीप वळसे, दिल्लात अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत मंत्री, खासदार असलेले प्रफुल्ल पटेल का जातात? याआधी सोनिया गांधी, नरेंद्र मोदी यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी पवार साहेब प्रफुल्ल पटेलांनांच पाठवत होते. ते का सोडून गेले याचा विचार करायला पाहिजे.” शरद पवारांना वाटतं की, छगन भुजबळांनी हे घडवून आणलं ही चुकीची कल्पना आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
तुम्ही शिवसेनेपासून दूर झाला की आम्ही काँग्रेसपासून दूर होतो, असं 2014 च्या निवडणुकीपूर्वी ठरलं होतं. त्यानंतर तुम्ही पाहिलं, भाजपने शिवसेनेला दूर केलं. राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा दिला. या चर्चांमध्येही मी कुठे नव्हतो. 2017 साली अजितदादा म्हणाले की उद्योगपतींच्या घरी पाच दिवस बैठका झाल्या. मंत्रिपद ठरली, खाती ठरली. पण तेव्हा तर मी जेलमध्ये होतो. 2019 च्या निवडणुका आल्या. त्यात पवार आणि मोदींची चर्चा झाली. त्यावेळी दोघांमध्ये ठरलं की निवडणुकीनंतर समझोता करु आणि सरकार करु. त्यानंतर भाजपने शिवसेनेला सोडलं, यापैकी कोणत्याही चर्चांमध्ये मी नव्हतो. मग मला दोष का? असा सवालही भुजबळ यांनी विचारला.