नाशिक : राष्ट्रवादीचे (NCP) बंडखोर नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांना ओळखण्यात माझी चूक झाली, असं म्हणतं शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिकमध्येच जाहीर कबुली दिली. राष्ट्रवादीतील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर शरद पवार यांनी पक्षबांधणीचा कार्यक्रम हाती घेतला असून ते महाराष्ट्र दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यातील आजच्या पहिल्या दिवशी ते छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील येवला या मतदारसंघात गेले होते. यावेळी बोलताना त्यांनी आपण भुजबळ यांना ओळखण्यात चूक केल्याचं म्हंटलं. (Nashik ncp chief sharad Pawar critisized rebel leader and minister chhagan bhujbal)
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तुम्ही भुजबळ यांना मंत्री केलं, अनेकांचा विरोध डावलून तुम्ही त्यांची मंत्रिपदी वर्णी लावली. वाईट काळात साथ दिली, आता त्यांची बंडखोरी बघून वाईट वाटतं का? असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी पवार यांना विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, त्याच्यामधून माणसाचं चारित्र्य कळून येतं. वाईट एकच वाटतं, म्हणजे माझ्याबाबतीत ही गोष्ट लागू होते. मी त्यांना ओळखू शकलो नाही. माझी त्यांना ओळखण्यात चूक झाली. याचा दोष मी भुजबळांना देणार नाही, अशी कबुली त्यांनी दिली.
दरम्यान, या बंडाबद्दल सांगताना “पवार साहेब आमच्यासाठी विठ्ठल असून, त्यांना बडव्यांनी घेरले आहे. घेरलेल्या बडव्यांना बाजूला सारत साहेबांनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी यावं, अशी साद छगन भुजबळ यांनी मुंबईच्या मेळाव्यात शरद पवार यांना घातली होती. भुजबळांच्या या वक्तव्याचा रोख जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे या तीन नेत्यांकडे असल्याची चर्चा त्यानंतर सुरू झाली आहे.
यावेळी छगन भुजबळ यांनी अनेक गोष्टींवर भाष्य करत गौप्यस्फोट केले होते. ते म्हणाले की, या सगळ्या गोष्टी अचानक झाल्या नाहीत; बऱ्याच महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरु होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करूनच हे पाऊल उचलल्याचं भुजबळांनी यावेळी सांगितले. शरद पवारांनी भाजपशी चर्चा करून सातत्याने शब्द फिरवला, छगन भुजबळांनी डागली पवारांवर तोफही यावेळी भुजबळ यांनी पवारांवर डागली होती.