MLA Nilesh Lanke : पारनेर-नगरचे आमदार निलेश लंके सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात आहेत. त्यांची अजित पवार यांच्याशी असणारी जवळीक ही अनेकदा दिसून आली आहे. लंके यांना आमदार करण्यात अजित पवार यांचा मोठा वाटा होता. मात्र त्याचवेळी शरद पवार यांनाही ते दैवत मानतात, आपले राजकीय गुरु शरद पवार असल्याचे सांगतात. परंतु अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांची झालेली द्विधा मनस्थिती दिसून आली होती. अखेरीस त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. (NCP MLA Nilesh Lanka gifted Sharad Pawar’s book “Silver Oak” to successful MPSC candidates.)
पण लंके अजित पवार यांच्यासोबत केवळ शरीरानेच असून मनाने ते अद्यापही शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे एका कृतीतून अधोरेखित झाले आहे. लंके यांच्या या कृतीची राज्यभरात चर्चा होत आहे. पारनेर-नगर मतदारसंघातील 22 विद्यार्थ्यांची विविध शासकीय पदांवर निवड झाली आहे. या सर्वांचा आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर या सर्वांना लंके यांनी भेट म्हणून शरद पवार यांचे “सिल्वर ओक” हे पुस्तक दिले. त्यामुळे लंके अद्यापही शरद पवार यांच्याचसोबत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना लंके म्हणाले, पारनेर-नगर मतदारसंघातील 22 विद्यार्थी हे MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. ही गोष्ट खूप अभिमानाची आहे, असे म्हणत या सर्वांना भविष्यातील वाटचालीसाठी आमदार निलेश लंके यांनी शुभेच्छा दिल्या.ज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात मध्यंतरी निर्माण झालेल्या तिढ्यानंतर पुण्यावरून काही उमेदवार माझ्याकडे आले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री तसेच सबंधितांशी संपर्क करून आपण त्यातून मार्ग काढला होता, असेही त्यांनी सांगितले.
निलेश लंके यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असला तरीही, ते शरद पवार की अजित पवार यांच्याबाबतीत अद्यापही द्विधा मनस्थितीमध्ये असल्याचे दिसून येते. अजित पवार गटात सहभागी होण्याची अगोदर घेतलेल्या एका कार्यक्रमात लंके यांनी आई-बापात कशी निवड करणार, कारण दोन्हीही हवे असतात, अशी भावना व्यक्त केली होती. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून आदरणीय शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे हे आमचे नेते व कुटुंब प्रमुख आहेत. ह्या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे. सध्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावे अशी माझी भूमिका आहे. अशा आशयाचे ट्विटही लंके यांनी केले होते.