Pune Nashik Semi High Speed Rail Project: अहिल्यानगर- पुणे–नाशिक सरळ (Pune-Nashik Semi High Speed Rail Project) रेल्वे मार्गाच्या मागणीसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी पुणे–नाशिक महामार्गावर एकाच वेळी चक्काजाम जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe Patil) यांनी केली.
यावर बोलताना आमदार तांबे म्हणाले की, एका बाजूला केंद्रीय मंत्र्यांकडून हा रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याचे सांगितले जात असले, तरी दुसऱ्या बाजूला जनतेच्या अपेक्षा आजही कायम आहेत. सरकारने नफा-तोट्याचा विचार न करता लाखो नागरिकांच्या भावना आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचे नाही. हा सामान्य नागरिकांचा लढा आहे. रेल्वेसारखे प्रकल्प शंभर वर्षांत एकदाच उभे राहतात. आज ही संधी हातची गेली, तर पुढील अनेक पिढ्यांना अशी संधी पुन्हा मिळणार नाही,” असे तांबे यांनी स्पष्ट केले. पुणे–नाशिक दरम्यानचा सध्याचा प्रवास दिवसेंदिवस अधिक कष्टदायक होत असल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, दोन ते तीन तासांत होणाऱ्या प्रवासासाठी आज सहा ते सात तास खर्च करावे लागत आहेत. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि वाढता ताण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरातील हजारो विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक आणि व्यावसायिक दररोज पुणे व नाशिकदरम्यान प्रवास करत असल्याने सरळ रेल्वे मार्गाची गरज अधिक तीव्र झाली आहे.
सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरूनगर, चाकण यांसह संपूर्ण परिसराला या रेल्वेमुळे मोठा विकासाचा वेग मिळेल. त्याचबरोबर पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांवरील वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता पुणे–नाशिक महामार्गावर विविध ठिकाणी एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगत, “केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आता जनतेनेच रस्त्यावर उतरले पाहिजे. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जनता एकजूट होते, तेव्हा सरकारला निर्णय घ्यावाच लागतो,” असे आमदार तांबे यांनी ठामपणे सांगितले.
शेवटी त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, “हे आंदोलन कोणत्या पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी नाही, तर भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सामान्य माणूस म्हणून या जनआंदोलनात सहभागी व्हावे.”
