राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डीले यांना तिहेरी बळ; माजी सैनिक, जेडीएससोबत शेतकरी संघटनेचाही जाहीर पाठिंबा

Rahuri By Election-पिंपळगाव उज्जैनी येथील उज्जैनी माता आजी माजी सैनिक संघाने जाहीर निवेदनातून अक्षय कर्डिले यांना पाठिंबा दिला.

Rahuri By Election Akshay Kardile

Rahuri By Election Akshay Kardile

Rahuri By Election : राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Rahuri By Election) पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असताना भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले (Akshay Kardile) यांना आता तिहेरी मोठा पाठिंबा मिळाला आहे. माजी सैनिक संघटना, जनता दल (सेक्युलर) आणि आता शिव श्री क्रांती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या तिन्ही प्रभावी घटकांनी कर्डीले यांच्या बाजूने उघड भूमिका घेतल्याने निवडणुकीत मोठी खळबळ उडाली आहे.

माजी सैनिकांचा ठाम निर्धार; विकासासाठी निःस्वार्थ पाठिंबा
पिंपळगाव उज्जैनी येथील उज्जैनी माता आजी माजी सैनिक संघाने जाहीर निवेदनातून कर्डिले यांना पाठिंबा देताना मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि जनतेशी बांधिलकी असलेले नेतृत्व आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. कर्डिले यांच्या सामाजिक कार्याचा ठसा आणि विकासाभिमुख दृष्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने नमूद केले आहे. तसेच संघटनेचे सर्व सदस्य घराघरात जाऊन प्रचार करणार असून कर्डिले यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

जेडीएसचा अधिकृत पाठिंबा; महायुतीला आणखी बळ
दरम्यान, जनता दल (सेक्युलर) या राज्यातील महायुती व केंद्रातील एनडीएचा घटक पक्षानेही अक्षय कर्डीले यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे महायुतीची ताकद आणखी भक्कम झाली असून कर्डीले यांच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली आहे. राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढल्याची चर्चा रंगू लागली आहे.

शेतकरी संघटनेची एन्ट्री; ग्रामीण मतदारांमध्ये मोठा प्रभाव
यात भर म्हणून आता शिव श्री क्रांती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांनीही कर्डीले यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रात नमूद केले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यातून उदय झालेली ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात सर्वधर्मीय शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर कार्यरत आहे.संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच तालुकाध्यक्ष यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला असून, आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत कर्डीले यांना विजयी करण्यासाठी संघटना पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राहुरीत कर्डीलेच भारी ;राजकीय चर्चांना उधाण
सलग मिळालेल्या या तीन मोठ्या पाठिंब्यांमुळे अक्षय कर्डीले यांची बाजू अधिक मजबूत होत असून, निवडणुकीचे चित्र झपाट्याने बदलत असल्याचे दिसून येत आहे. माजी सैनिक, प्रादेशिक पक्ष आणि शेतकरी संघटना अशा विविध स्तरांवरील पाठिंब्यामुळे कर्डीले यांचा प्रभाव वाढत असल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version