नाशिक : गिरीश दत्तात्रेय महाजन. जळगामधील जामनेरचे भाजपचे (BJP) आमदार. पण उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील बडे नाव अन् भाजपचे सर्वेसर्वा. त्यांच्याकडेच भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील निवडणुकांसह विविध निर्णय घेण्याचे अधिकार होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना ते सर्वात वजनदार नेते होते. फडणवीसांसाठी ते संकटमोचक होते. आंदोलनं असो, मोर्चे असो की निवडणुका असो. महाजनांकडे जबाबदारी दिली की ती कामगिरी फत्ते व्हायची. पण याच महाजन यांचे सध्या पंख छाटले असल्याची चर्चा उत्तर महाराष्ट्रात सुरु आहे. (Rajendra-Kumar-Gavit-replaced-Girish-Mahajan-in-organization- structurer -Nashik)
गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकचे प्रभारीपद काढून घेतल्याने त्यांचे पंख छाटल्याची चर्चा सुरु आहे. महाजन यांच्या जागी ही जबाबदारी भाजपचे नंदुरबारमधील ज्येष्ठ नेते आणि पालघरचे खासदार राजेंद्रकुमार गावित यांच्याकडे सोपविली आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्राची संघटनात्मक जबाबदारी देखील पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच घोषणा केली.
गिरीश महाजन यांना यापूर्वी जळगाव आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरुन डावलण्यात आलं. जळगावचे पालकमंत्रीपद गुलाबराव पाटील यांच्याकडे तर नाशिकचे पालकमंत्रीपद दादा भुसे यांच्याकडे देण्यात आले. महाजन यांच्याकडे नांदेड, लातूर आणि धुळे या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आहे. यापूर्वी महाजन यांच्याऐवजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे संपर्कमंत्री पद सोपविण्यात आले, तर महाजन यांच्याकडे बीड आणि संभाजीनगरची जबाबदारी देण्यात आली.
मात्र या सर्व चर्चांना भाजपकडून छेद देण्यात आला. याबाबत नाशिक भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी मंत्री महाजन यांचे उत्तर महाराष्ट्रातील स्थान आणि अधिकार कायम असल्याचे सांगितले. पालवे म्हणाले, “मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील प्रबळ नेते आहेत. उत्तर महाराष्ट्रातील निवडणुका आणि महाजन समीकरण सर्वश्रुत आहे. प्रभारी पदाच्या नेमणुका हा भाजपचा संघटनात्मक रचनांचा भाग आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर भाजप प्रदेश पदाधिकारी, सरचिटणीस यांना विभागीय प्रभारी म्हणून तर उपाध्यक्ष व चिटणीस यांना जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. गिरीश महाजन यांच्या अधिकारात कुठलेही बदले झाले नाहीत. ते आबाधित आहेत, असेही पालवे यांनी स्पष्ट केले.