Download App

राम शिंदे यांच्याकडून रडीचा डाव; रोहित पवारांचा थेट आरोप

Rohit Pawar On Ram shinde : कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीवरुन (Karjat Bazar Committee Election)पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे (Karjat-Jamkhed Constituency)आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी आमदार राम शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राम शिंदे यांच्याकडून रडीचा डाव खेळला जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. ते आज पुण्यामध्ये काही कार्यक्रमानिमित्त गेले होते, त्यावेळी रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.

कर्जतमध्ये सभापती-उपसभापतीही ईश्वर चिठ्ठीने ठरणार ? फेर मतमोजणीत काय झाले ?

रोहित पवार म्हणाले की, ज्यावेळी कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत आमचे आणि विरोधकांचे नऊ-नऊ उमेदवार निवडून आले. ते स्वीकारायचं असतं पण राम शिंदेंकडून आता रडीचा डाव खेळला जात आहे. नियमात नसताना सुद्धा संवैधानिक नसताना निकाल जाहीर झाल्यानंतर देखील फेरमतमोजणी केली जाते. यालाच तर आपण अहंकार म्हणतो. जाऊद्या भाजपच्या लोकांना अहंकार आहे.

भाजपकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही दबाव आणला जात आहे. जे काही करायचं ते करा, पण ते 2024 पर्यंतच कराल ना, त्यानंतर लोकांचीच सत्ता राज्यात येईल म्हणजे महाविकास आघाडीचीच सत्ता राज्यात येईल आणि त्यावेळी लोकांच्या बाजूने जे योग्य असेल तेच केलं जाईल, पण जे लोकं चुकीच्या पद्धतीनं वागले आहेत, त्या लोकांचं काय करायचं ते आपण नंतरच पाहू असा थेट इशाराही यावेळी रोहित पवारांना म्हणाले.

सध्या जामखेड-कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरु आहे. त्यात मतदारांनाही दोन्ही गटाचे समसमान नऊ संचालक निवडून दिले आहे. जामखेडचे सभापती-उपसभापती हे ईश्वर चिठ्ठीने ठरले आहे. सभापती शिंदे गटाला, तर उपसभापती पवार गटाचा झाला आहे.

कर्जतमध्ये शिंदे गटाच्या दोन उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती मात्र या मतमोजणीमध्ये काहीही फरक झाला नाही. त्यामुळे आता सभापती-उपसभापती निवडीकडे लक्ष लागले आहे. जामखेडप्रमाणेच कर्जतला सभापती-उपसभापती निवड ईश्वर चिठ्ठीने होण्याची शक्यता आहे.

कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष फोडला होता. त्यानंतर जोरदार राजकारण झाले. पण या ठिकाणी दोन्ही गटाचे सम-समान नऊ संचालक निवडून आले आहेत. त्यामुळं जोरदार चर्चांना उधान आलं आहे.

Tags

follow us