अहमदनगर : राज्याच्या राजकारणात काका पुतण्यांचा संघर्ष आपण पाहत आहोत. तसाच आणखी एक संघर्ष बलाढ्य राजकारणी असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दिसून येत आहे. श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांना पुतण्याने ग्रामपंचायत आणि बाजार समितीमध्ये धक्के दिलेच. परंतु आता पुतण्या थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात दाखल होत आहे. दिवंगत भाजप नेते सदाशिव पाचपुते यांचे पुत्र आणि श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात मोठ्या काष्टी ग्रामपंचायतीचे सरपंच साजन पाचपुते ठाकरेंच्या गोटात पक्षात प्रवेश करणार आहेत. (son of late BJP leader Sadashiv Pachpute and sarpanch of the Kashti gram panchayat Sajan Pachpute will join shivsena party)
बबनराव पाचपुते यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, यानिमित्ताने वर्षभरापासून सुरु असलेल्या काका-पुतण्याच्या वादात आता थेट उद्धव ठाकरे यांनी एन्ट्री घेतली आहे. मात्र श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने आणि ठाकरेंची फारशी ताकद नसतानाही साजन पाचपुतेंनी यांनी नेमकी कोणती राजकीय गणित मांडून ठाकरेंच्या गटाचा पर्याय निवडला हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
श्रीगोंदा तालुका पाचपुते कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातो. बबनराव पाचपुते यांनी आतापर्यंत सातवेळा इथली आमदारकी भुषविली आहे. मात्र त्यांना राजकारणात उभे करण्यास सदाशिव पाचपुते यांनी मोठी भूमिका बजावली. शिवाय त्यांच्याअनुपस्थितीत जिल्हा परिषद, बाजार समितीचे राजकारण सदाशिव पाचपुते यांनीच संभाळले. दोन वर्षांपूर्वी सदाशिव यांचे निधन झाले, त्यानंतरही हे कुटुंब एकत्रच राहिलं असं सांगितलं जात होतं. स्वतः साजन यांनीही आपण आमदार पाचपुते यांच्यासोबतच असल्याचे सांगितले होते.
मात्र वडिलांच्या निधनानंतर साजन यांनी राजकीय तयारी सुरु केली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याचे, तालुक्यातील सर्वपक्षीय लोकांना जोडण्याचे काम सुरू केले. शिवाय कारखान्याची जबाबदारी खांद्यावर घेत साजन व सुदर्शन या बंधूंनी चोख पार पाडली. मात्र साजन पाचपुचे ही तयारी जिल्हा परिषदेसाठी करत असावेत असे सांगितले गेले. पण डिसेंबर 2022 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी विरोधी भूमिका घेतली.
बबनराव पाचपुते यांनी मुलगा प्रताप यांना सरपंचपदासाठी उभे केले होते. तर त्यांच्याविरोधात साजन यांनी मैदानात उडी घेतली. ग्रामपंचायत बबनराव पाचपुते यांच्याकडे गेली पण थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक जिंकत त्यांनी काकांना चितपट केले. त्यानंतर बाजार समिती निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीच्या राहुल जगताप यांच्या पॅनेलमधून निवडणूक लढवत काकांच्या पॅनेलला पराभावाचा धक्का दिला होता.
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत आणि साजन पाचपुते यांचे जवळचे संबंध आहेत. गत महिन्यात त्यांनी मुंबईत उध्दव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता साजन पाचपुते आज ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. मात्र श्रीगोंद्याची जागा सध्या राष्ट्रवादीकडे आहे. गतवेळी माघार घेतलेले राहुल जगताप यांनी तयारी सुरु केली आहे. अशात जर राष्ट्रवादीला नाही मिळाली तर काँग्रेसच्या नागवडे कुटुंबियांनीही तयारी सुरु केली आहे. त्यामुळे साजन पाचपुते यांनी श्रीगोंद्याच्या जागेसाठीची समीकरण कशी मांडली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.