कोपरगावात वाढत्या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करा, आमदार काळेंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे माणी

कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहराच्या वाढत्या अवैध धंद्यावर पोलीस प्रशासनाकडून आळा बसेल यावरचा नागरीकांबरोबरच माझाही विश्वास उडाला आहे.

News Photo   2025 12 03T175921.304

कोपरगावात वाढत्या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करा, आमदार काळेंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे माणी

कोपरगाव मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून (Kopargaon) अनेक प्रकारचे अवैध धंदे खुले आम सुरू असून पोलीस प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करीत आहे. अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गुन्हेगारीचा आलेख देखील वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यावर तातडीने अंकुश लावावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केलेल्या लेखी निवेदनात केली आहे.

आशुतोष काळे यांनी बुधवार (दि.०३) रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेवून कोपरगाव मतदार संघासह शहरात वाढलेल्या अवैध धंद्याबाबतची माहिती देवून त्याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याकडे त्यांचे लक्ष वेधून वाढलेल्या अवैध धंद्याला आळा बसावा याबाबत सविस्तर निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरासह मतदार संघातील अनेक गावांमध्ये खुलेआम जुगार व मटका सुरू असून या सर्व प्रकारांकडे स्थानिक पोलीस प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.

अवैध दारू विक्री तसेच तंबाखू,गुटखा विक्री सर्रासपणे उघडपणे सुरू आहे. ऑनलाईन बेटिंगचे जाळेही मोठ्या प्रमाणावर पसरले असून अनेक तरुण त्यात अडकत आहेत. याशिवाय भरदिवसा गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा बिनदिक्कतपणे सुरू आहे. वाढलेल्या अवैध धंद्यामुळे तरुणाई चुकीच्या मार्गाला जाण्याची भीती नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून कोपरगाव मतदार संघात अवैध धंद्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोपरगावमधील गौतम बँकेला ग्रीन वर्ल्ड को प्राईड पुरस्कार जाहीर

विशेषतः तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनता व गुन्हेगारीकडे वळत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. परिणामी शहरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेवरही परिणाम होत आहे.त्याबाबत आपण व्यक्तिश: लक्ष घालून कोपरगाव मतदार संघातील वाढलेल्या अवैध धंद्यांना लगाम बसेल यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहराच्या वाढत्या अवैध धंद्यावर पोलीस प्रशासनाकडून आळा बसेल यावरचा नागरीकांबरोबरच माझाही विश्वास उडाला आहे. त्यामुळे याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची भेट घेवून त्यांनी स्वत: हस्तक्षेप करून कठोर पावले उचलण्याचे साकडे त्यांना घातले आहे. त्यांनीही तात्काळ कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे.त्यामुळे मला विश्वास आहे की, निश्चितपणे मतदार संघासह कोपरगाव शहराच्या वाढत्या अवैध धंद्यांना चाप बसेल. मात्र जर हे अवैध धंदे थांबले नाही तर वाढत्या अवैध धंद्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर उतरून वेळप्रसंगी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असंही काळे म्हणाले.

Exit mobile version