जळगाव : अमळनेरचे तीनवेळचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (5 सप्टेंबर) जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेपूर्वी पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. बी. एस. पाटील यांच्या रुपाने राष्ट्रवादीचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक अनिल भाईदास पाटील यांच्या बंडखोरीला उत्तर देण्यासाठी पवार यांनी हुकमी एक्का शोधला असल्याची चर्चा आहे. (Three-time former MLA of Amalner Dr. B. S. Patil joined the NCP (Sharad Pawar) faction)
डॉ. बी. एस. पाटील हे अमळनेरमधून भाजपच्या तिकीटावर 1995, 1999 आणि 2004 असे सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2009 मध्ये भाजपने त्यांना तिकीट नाकारुन त्यांचाच शिष्य असलेल्या अनिल भाईदास पाटील यांना तिकीट दिले. त्यामुळे बी. एस. पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली. मात्र त्यांचा मोठ्या मतांनी पराभव झाला. मात्र त्यांच्या बंडखोरीमुळे अनिल पाटील यांनाही पराभव स्वीकारावा लागला.
त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांना ना काँग्रेसने तिकीट दिले, ना भाजपने. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्वगृही परत येण्याचा निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये बी. एस. पाटील चांगलेच चर्चेत आले होते. भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि पाटील यांच्यात वाद उफाळला होता. यात पाटील यांना एका सभेत मारहाण देखील झाली होती. उदय वाघ यांची गुंडगिरी चालू असून त्यांच्याविरोधात आपण पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र दखल घेत नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.
अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व देण्यासाठी पवार यांनी भाजपमधीलच माजी आमदारांना राष्ट्रवादीत घेण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपने ज्या माजी आमदारांकडे दुर्लक्ष केलं आहे, अशा आमदारांवर मागील काही दिवसांपासून पवार यांची नजर आहे. यानुसार बी. एस. पाटील यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
रोड कॉन्ट्रॅक्ट घेत रस्त्यांची छोटी-मोठी काम करणारा व्यक्ती म्हणून कधी काळी अनिल पाटील यांची ओळख होती. मात्र त्यानंतर तत्कालिन आमदार बी. एस. पाटील यांना गुरु मानत अनिल भाईदास पाटील यांनी राजकारणा एन्ट्री घेतली. मात्र काहीच दिवसात शिष्याने गुरुपासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला अन् विधानसभेची पहिली निवडणूक थेट गुरुविरोधातच लढवली. त्यानंतर आता अनिल पाटील यांनी बंडखोरी करत अजितदादांना साथ दिल्याने बी. एस. पाटील यांना राष्ट्रवादीत घेत शरद पवार यांनी शिष्याचे टेन्शन वाढविले असल्याची चर्चा आहे.