अहिल्यानगर-मनमाड महामार्गाची वाहतूक कोंडी सुटणार; होमगार्डची संख्या वाढविणार

Ahilyanagar-Manmad highway-वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्‍यासाठी पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या निर्देशानंतर जिल्‍हा प्रशासनाने होमगार्ड नियुक्‍तीसाठी हालचाली सुरु केले आहे.

Radhakrishna Vikhe Patil Nagar Manmad Highway

Radhakrishna Vikhe Patil Nagar Manmad Highway

अहिल्यानगर: अहिल्‍यानगर-मनमाड (Ahilyanagar-Manmad highway) या रस्‍त्‍याच्‍या दुरुस्‍तीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या महामार्गावर होमगार्ड नियुक्त केले जाणार आहेत. वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्‍यासाठी पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्‍या निर्देशानंतर जिल्‍हा प्रशासनाने होमगार्ड नियुक्‍तीसाठी हालचाली सुरु केले आहे. अधिकचे मनुष्‍यबळ उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी राज्‍याच्‍या होमगार्ड विभागाकडे मागणी केली आहे.

अहिल्‍यानगर मनमाड महामार्गाच्‍या कामाच्‍या राहुरी शहर आणि परिसरातील बहुतांशी ठिकाणी वाहतूक वळविण्‍यात आली आहे. एकेरी वाहतूक सुरु असल्‍याने मोठ्या प्रमाणात होत असलेल्‍या वाहतूक कोंडीमुळे स्‍थानिक नागरीक, प्रवासी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांची मोठ्या प्रमाणात अडचण होवू लागली आहे. सर्वच व्‍यवस्‍थांवर या वाहतूक कोंडीचा विपरीत परिणात झाला आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी जिल्‍हा प्रशासनाला वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्‍याचे तातडीने निर्देश दिले होते. वाहतूकीवर नियंत्रण मिळविण्‍यासाठी अधिकचे मनुष्‍यबळ उपलब्‍ध करावे अशी सूचना त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनास दिल्‍या होत्‍या. या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकारी डॉ.पंकज आशिया ((Dr. Pankaj Ashiya) यांनीही जिल्‍हा पोलिस प्रशासनास होमगार्ड पथक उपलब्‍ध करुन देण्‍याच्‍या सुचना दिल्‍या आहेत.

पोलिस प्रशासनानेही होमगार्डच्‍या राज्‍याच्‍या महासमादेशकांना वाहतूक नियमनासाठी तीस दिवसांच्‍या कालावधीसाठी २० होमगार्ड उपलब्ध करुन देण्‍याची विनंती केली आहे. अहिल्‍यानगर मनमाड मार्गाचे काम आता वेगाने सुरु झाले असून, दोनच दिवसांपूर्वी डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्‍वत: रस्‍त्‍यावर उतरुन वाहतूक कोडींची समस्‍या सोडविण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु केले होते.

Exit mobile version