रीलस्टार म्हणून हिणवणी, कुटुंबावर टीका आणि पक्षांतराच्या चर्चा; ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

राजकीय चर्चांमुळे झालेली हेटाळणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील पराभव यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सविस्तर भाष्य केले.

Untitled Design 30

Untitled Design 30

Omraje Nimbalkar expressed strong displeasure : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्षांतराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुण्यातून धाराशिवला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वडिलांच्या हत्येच्या प्रकरणातील न्यायालयीन निकाल, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांमुळे झालेली हेटाळणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील पराभव यावर सविस्तर भाष्य केले.

ओमराजे निंबाळकर म्हणाले की, आज गोवर्धनवाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली असून दुपारी चार वाजता कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय जाहीर केला जाईल. कोणतीही राजकीय भूमिका घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांचे आणि सामान्य लोकांचे मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणाचा देखील उल्लेख केला. 3 जून 2006 रोजी त्यांच्या कुटुंबाने जी वेदना भोगली, त्याच वेदनेची आठवण न्यायालयीन निकालानंतर पुन्हा झाली असल्याचे ते म्हणाले. न्यायालयाने राजकीय वैमनस्य असल्याचे नमूद केले, मात्र मग हत्या नेमकी कोणी केली हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. वडिलांच्या निधनाच्या दिवशीच आपल्या राजकीय प्रवासाची सुरूवात झाली आणि सामान्य जनतेनेच आपल्याला इथपर्यंत पोहोचवले असल्याने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी लोकांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांवर बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली. आपण कोणताही निर्णय जाहीर केलेला नसताना देखील आपल्या कुटुंबावर टीका करण्यात आली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ चर्चांमुळे एखादा माणूस तीन दिवसांत वाईट ठरत असेल तर ते दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी रिलस्तर म्हणून मारण्यात आलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिल.

ठाकरे ते शाहरुख खान; सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नसमारंभाला ‘या’ दिग्गज मंडळींनी सहकुटुंब लावली हजेरी

लोक एखाद्या व्यक्तीच्या कामाला मत देतात, केवळ सोशल मीडियावरील प्रतिमेला नाही, असे ते म्हणाले. दरम्यान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाबद्दल आदर कायम असल्याचे त्यांनी स्पष्टकेले. आपण न बोललेली मुलाखत प्रसिद्ध करण्यात आल्याने दुःख झाल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. स्थानी स्वराज्य संस्थांचया निवडणुकांमध्ये मशाल चिन्हावरील उमेदवारांच्या झालेल्या पराभवाबाबत देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने साथ दिली, मात्र पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाला यश का मिळाले नाही, याचा शोध घेण्याची वेळा आल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या लोकसभा मतदारसंघातील एकही पंचायत समिती किंवा नगरपालिका जिंकता आली नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे नमूद करत त्यांनी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी दिवसाचे 24 तास जनतेसाठी काम करत अस्ताणे देखील पराभव का झाला, असा सवाल उपस्थित केला. पक्ष नेतृत्वावर भाष्य न करता स्थानिक पातळीवर नेमके काय घडले, आमच्या उमेदवारांची हेटाळणी का झाली आणि जनतेने त्यांना नाकारण्यामागील कारणे काय होती, याचा शोध घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

आपल्या उमेदवारांची प्रतिमा स्वच्छ असतानाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, हे चिंतेचे कारण असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, आज धाराशिवमध्ये होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर आपण आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या पुढील निर्णयाकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version