कांद्याचे दर कोसळले! आठवडाभरात 900 रुपयांची घसरण, लासलगाव बाजार समितीत काय आहेत नवे दर?

Lasalgaon Onion Price : लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात आठवडाभरात प्रतिक्विंटल 900 रुपयांची घसरण झाली आहे.

News Photo   2026 11 24T150244.628

Lasalgaon Onion Price

Lasalgaon Onion Price : दुष्काळाच्या झळा सोसत कसाबसा उभा केलेला कांद्याचा पीक आता शेतकऱ्यांसाठी आर्थिक संकटाचे कारण ठरत आहे. पावसाअभावी पिके करपली, सिंचनासाठी टँकरचा आधार घ्यावा लागला आणि उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली. (Onion) अशा परिस्थितीत हाताशी आलेल्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, कांद्याचे प्रमुख केंद्र असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दरात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादकांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

लासलगाव बाजारपेठेत कांद्याचे दर घसरण्यामागे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती कारणीभूत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक वाढल्याने दरावर दबाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम होत आहे. याचा थेट फटका स्थानिक बाजारभावाला बसत असून कांदा उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे.

Gokul Milk : गोकुळ अध्यादेशासाठी सरकारने मोजले तब्बल 80 लाख ; बंटी पाटील म्हणाले

दरम्यान, बाजारभावातील घसरणीची आकडेवारीही शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. गेल्या मंगळवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल कमाल 5,700 रुपयांचा भाव मिळाला होता. मात्र, आता हा दर घसरून 4,871 रुपयांपर्यंत आला आहे. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची सुमारे 353 वाहनांमधून आवक झाली. या कांद्याला प्रतिक्विंटल कमाल 4,861 रुपये, किमान 1,500 रुपये, तर सरासरी 4,000 ते 4,400 रुपयांपर्यंत भाव मिळाला. अवघ्या आठवडाभरात जवळपास 900 रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

आधीच दुष्काळामुळे उत्पादनावर परिणाम झाला असताना कांद्याचे दरही घसरल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. पाणीटंचाईमुळे टँकरने पाणी विकत घेऊन पीक जगवावे लागले. त्यामुळे लागवड, सिंचन आणि उत्पादनासाठी मोठा खर्च करावा लागला आहे. मात्र, बाजारात मिळणाऱ्या सध्याच्या दरातून हा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. सरकारने कांदा उत्पादकांच्या परिस्थितीची दखल घेऊन बाजारभावाला आधार देण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Exit mobile version