Download App

महाराष्ट्रातून झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण पुरस्कार; पुरस्कारांमध्ये राजकीय नेत्यांचाही समावेश

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून ज्येष्ठ तबला वादक झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर राजकीय नेत्यांमध्ये मुलायम सिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय. देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राजकीय नेत्यांसह इतर विविध क्षेत्रातील अनेकांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

नुकतीच केंद्र सरकारकडून यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये एकूण ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण मिळाला आहे.

तर कुमार मंगलम् बिर्ला, दीपक धार आणि सुमन कल्याणपूरकर यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर भिकू रामजी इदाते, राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), प्रभाकर मांडे, डॉ. परशुराम खुणे, गजानन माने, रमेश पतंगे, रविना टंडन, कुमी वाडिया हे पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. तसेच ओआरएसचे निर्माता दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण, तर झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पद्म पुरस्कार देशाचे राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतो. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्काराने मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे.

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा, इत्यादी विविध शाखा कार्यक्रमांमध्ये पुरस्कार दिले जातात.

‘पद्मविभूषण’ प्रदान केला जातो. अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी; उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कारांची घोषणा केली जाते.

Tags

follow us