राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील नद्या ओसंडून वाहत आहेत. अशातच एका गरोदर महिलेला डोलीच्या मदतीने नदीचं पात्र पार करुन रुग्णालयात घेऊन जात असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कुर्लोद हद्दीतील शेंडेपाडा इथं घडलीय.
गरोदर महिलेचा थरारक प्रवास; आधी झोळी मग लाकडी ओंडक्यातून नदी पार#palgharnews #pregnantwomen #travelfloodwater #letsuppmarathi
गरोदर महिलेला पूलाअभावी ओंडक्याच्या सहाय्याने नदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागला आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील शेंडेपाडा इथली आहे. pic.twitter.com/fLEJi2goCV
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 25, 2023
त्याचं झालं असं की, राज्यभरात सध्या पावसाने जणू काही थैमानच घातलंय. त्यामुळे कोकण भागातील अनेक नद्यांच्या पातळीत भरघोस पाण्याची वाढ झालीयं. पालघर जिल्ह्यातही नद्या ओसंडून वाहत आहेत. अशातच सुरेखा लहू भागडे या सात महिन्यांच्या गरोदर आहेत.
सात महिन्यांच्या या गरोदर महिलेला सकाळपासूनच त्रास होत असल्याने तिला तत्काळ रुग्णालयाच पोहचवणं गरजेचं होतं. जोराचा पाऊसही सुरुच. या परिस्थितीत तिला गावातील काही लोकांच्या मदतीने झोळी करुन घरापासून नदीपर्यंत नेण्यात आलं. त्यानंतर पुढचा प्रवास नदीच्या पात्रातून करायचा होता, अशावेळी तिला गावकऱ्यांनी एका लाकडी ओंडक्यावर बसवून स्वत:च्या जीवाची बाजी लावली. ओंडकच्याच्या मदतीने दुथडी भरुन वाहत असलेल्या नदीतून किनारा पार केला.
मणिपूर मुद्द्यावरून विरोधकच पळ काढताहेत, सरकार चर्चेसाठी तयार; भाजपची टीका
नदीतून किनारा पार करताना महिलेच्या मानेपर्यंत नदीचं पाणी येत होतं. मात्र, जीव मुठीत धरुन हे लोकं प्रवास करीत होते. गावातून रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी रस्ता आणि नदीवर पूल नसल्याने गरोदर महिलेला जीव धोक्यात घालून नदीचा प्रवास करावा लागल्याचं हे वास्तव समोर आलं आहे.
अनेक वर्षांपासून पूलाची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे, मात्र, प्रशासन आणि लोकप्रतिनीधींच्या दुर्लक्षामुळे इथल्या आदिवासी जनतेला हा त्रास सहन करावा लागत असल्याचं उपसरपंच मोहन मोडक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अनेक वर्षांपासून असलेली पूलाची मागणी आणि मुलभूत सुविधा आम्हाला कधी मिळणार? किती लोकांचा जीव गेल्यानंतर सरकारला लक्ष घालणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.