Pankaja retires he will send entire clan to jail Manoj Jarange criticizes Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित कवी संमेलनाच्या समारोप सोहळ्यात मंत्री पंकजा मुंडे यांनी कवितेचा संदर्भ देत मला जर राजकारण माझ्यासारखं वाटलं नाही, माझ्या विचारांशी ते समरस नाही असं वाटलं, तर जसा समृद्धी महामार्गावर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल. असं म्हणत राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यावर आता मराठी आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेत भीती व्यक्त केली तसेच गंभीर आरोप केला आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?
पंकजा मुंडेंनी कंटाळा आला म्हणून जर राजकारण सोडलं, तर वारसाच मोडेल. मग धनंजय मुंडे सगळा समाज मोडून टाकतील. टोळ्याच टोळ्या निर्माण होतील. फक्त मारामाऱ्या होतील. मात्र त्यांनी आता मराठा समाजाशी मारामाऱ्या करू नये. त्यांच्या पाठीशी मी आहे. तुम्ही मस्साजोग प्रकरणात वाचले आहात. तसेच मला धमकी देण्याच्या प्रकरणातही तु आहेस. ज्या दिवशी तू अजितदादांसोबत नागपूरमध्ये फडणवीसांना भेटला तेव्हा तुला वाचवलं आहे. मात्र फडणवीसांकडे तुझा सगळा डेटा आहे. कधीही तो बाहेर काढून तुला अडकवलं जाऊ शकतं. असं म्हणत मनोज जरांगे यांनी भीती व्यक्त केली तसेच गंभीर आरोप केला आहे.
तुझ्यामुळं मराठा वंजारी समाजात दुरावा निर्माण झाला आहे. तसेच त्याचा त्रास तुझ्या बहिणीला ही होत आहे. त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर मी त्यांना काही सल्ला नाही देऊ शकत पण गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवण्याची हिंमत त्यांच्यात आहे. त्यांनी गोरगरिब जातीला उसतोडीतून बाहेर काढलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी राजकारणातून माघार घेतली तर ही जात धनंजय मुंडेच्या हातात गेली तर तो ती पूर्ण जेलमध्ये घालेल. गोरगरिबांना अन्नापासून वंचित करेल.
बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित कवी संमेलनाच्या समारोप सोहळ्यात मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कार्यक्रमादरम्यान एका कवीने राजकारणातील विसंगती, विलंब आणि व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करणारी कविता सादर केली. या कवितेतील आशयाला पंकजा मुंडे यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. मात्र, त्यानंतर त्यांनी केलेले भाष्य अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले आहे.
