Phulwa Khamkar : ’चित्रपताका’तील कार्यशाळेत फुलवा खामकर यांनी नृत्यदिग्दर्शनाचे मर्म उलगडले

Phulwa Khamkar : चित्रपटातील गाणे प्रभावीपणे पडद्यावर साकारण्यासाठी नृत्यकौशल्याबरोबरच संगीत, शब्द, ताल, कलाकारांच्या हालचाली आणि

Phulwa Khamkar

Phulwa Khamkar

Phulwa Khamkar : चित्रपटातील गाणे प्रभावीपणे पडद्यावर साकारण्यासाठी नृत्यकौशल्याबरोबरच संगीत, शब्द, ताल, कलाकारांच्या हालचाली आणि कॅमेऱ्याचा योग्य समन्वय साधणेही तितकेच महत्त्वाचे असते. नृत्यदिग्दर्श कार्ययाळेमध्ये त्या बोलत होत्या. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात सुरू असलेला महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव ‘चित्रपताका’मध्ये चित्रपट प्रदर्शनाबरोबरच सिनेमाकलेच्या विविध अंगांचा परिचय करून देणाऱ्या कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत मंगळवारी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकर यांची ‘नृत्याची भाषा’ ही सिनेनृत्य आणि नृत्यदिग्दर्शन यांचे धडे देणारी कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

यावेळी आपल्या नृत्यदिग्दर्शनाच्या प्रवासातील अनुभव सांगताना त्यांनी ‘नटरंग’सारख्या चित्रपटांमधील गाणी आणि त्यासाठी केलेल्या कामाचा उल्लेख केला. नृत्यदिग्दर्शकाने स्वतःचे ज्ञान सतत वाढवत राहणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी वाचनाचे महत्त्वही अधोरेखित केले. विविध विषयांवरील पुस्तके वाचल्यामुळे विचारांची व्याप्ती वाढते आणि सर्जनशीलतेला नवे आयाम मिळतात. त्यामुळे नृत्यदिग्दर्शकाने केवळ नृत्यापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता व्यापक वाचन आणि अभ्यास करायला हवा, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

‘फिल्म कोरिओग्राफी’ची संकल्पना स्पष्ट करताना फुलवा खामकर यांनी चित्रपटातील गाण्याच्या निर्मितीमध्ये नृत्यदिग्दर्शकाची भूमिका किती व्यापक असते, हे अधोरेखित केले. यावेळी त्या म्हणाल्या की, गाण्याचे संगीत, त्यातील शब्द आणि ताल यांचा अभ्यास करून कलाकारांच्या हालचालींची रचना करावी लागते. त्याचबरोबर कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या हालचाली प्रभावीपणे कशा टिपल्या जातील, याचाही विचार करावा लागतो. नृत्यदिग्दर्शन म्हणजे गाण्याच्या प्रत्येक घटकाचा समन्वय साधत त्याला पडद्यावर सुसंगत आणि परिणामकारक रूप देण्याची प्रक्रिया आहे. प्रसंगानुरूप योग्य निर्णय घेण्याची क्षमता हा नृत्यदिग्दर्शकासाठी महत्त्वाचा गुण असल्याचेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. तसेच नृत्यदिग्दर्शन ही सांघिक प्रक्रिया असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या की, नर्तक, दिग्दर्शक, छायांकनकार आणि वेशभूषाकार यांच्याशी योग्य संवाद व समन्वय राखणे आवश्यक असून नृत्यदिग्दर्शकाला कॅमेऱ्याच्या कामकाजाची मूलभूत माहिती असणेही गरजेचे आहे.

या कार्यशाळेत फुलवा खामकर यांनी ‘वाजले की बारा’ हे गाणे दाखवून त्यातील सादरीकरण आणि नृत्यदिग्दर्शनाचे बारकावे प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगितले. तसेच ‘पिंजरा’ चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेचा संदर्भ देत गाण्यांच्या चित्रीकरणात शॉट डिव्हिजन आणि पूर्वतयारीचे महत्त्व स्पष्ट केले. नृत्यदिग्दर्शनाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी ‘पिंजरा’ चित्रपटातील गाणी आवर्जून पाहावीत, अशी सूचनाही त्यांनी याप्रसंगी केली. मास्टरक्लासच्या अखेरीस प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना फुलवा खामकर यांनी प्रात्यक्षिकांसह उत्तरे दिली. यावेळी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे, महोत्सवाचे क्युरेटर डॉ. संतोष पाठारे यांच्यासह सिनेरसिक आणि नृत्याकलेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version