भोपाळ : राष्ट्रवादी काँग्रेसवर जळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप आहेत. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध उत्खनन घोटाळा.. यांची यादी खूप मोठी आहे. या पक्षाच्या घोटाळ्यांचे मीटर डाऊन होतच नाही, असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला. ते भोपाळ येथील ‘मेरा बूथ-सबसे मजबूत’ या भाजपच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी इतर विरोधी पक्षांवरही तोंडसुख घेतले. (PM Narendra Modi allegations on NCP and Sharad Pawar on Corruption)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी भाषण करताना एका महिलेने पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीवरुन प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, सध्या एक नवीन शब्द खूप लोकप्रिय केला जात आहे, तो म्हणजे गॅरंटी. भाजपच्या कार्यकर्त्यांवर खूप मोठी जबाबदारी आहे, त्यांनी लोकांना सांगावं की विरोधक कोणत्या गोष्टीची गॅरंटी आहेत. हे सगळे लोक, हे पक्ष भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे. लाखो करोडो रुपयांच्या घोटाळ्यांची गॅरंटी आहे.
काही दिवसांपूर्वी सर्व विरोधी पक्षातील लोकांचा भेटून फोटो काढण्याचा एक कार्यक्रम झाला. या बैठकीत सहभागी झालेल्या पक्षाच्या इतिहास बघितला तर कळेल की, त्या सगळे मिळून कमीत कमी 20 लाख कोटींच्या घोटाळ्यांची गॅरंटी आहेत. यात काँग्रेसचा घोटाळाच लाखो, करोडो रुपयांचा आहे. एक लाख 86 हजारांचा कोळसा घोटाळा, 1 लाख 74 कोटींचा टू जी घोटाळा, 70 हजार कोटींचा कॉमनवेल्थ घोटाळा, 10 हजार कोटींचा मनरेगा घोटाळा, हेलिकॉप्टरपासून युद्धनौकापर्यंत एकही क्षेत्र नाही, जिथे काँग्रेसने घोटाळा केलेला नाही, असा हल्लाबोल मोदींनी केला.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय जनता दल, द्रविड मुन्नेत्र कळघम, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरील घोटाळ्याच्या आरोपांची यादी वाचून दाखविली. ते म्हणाले, आरजेडीचे घोटाळे आहेत.. यात चारा घोटाळा, अलकतरा घोटाळा, शेड घोटाळा, महापूर दिलासा निधी घोटाळा आहे. आरजेडीच्या घोटाळ्यांची यादी वाचून न्यायालय देखील दम लागला. डीएमकेवर 1.25 लाख कोटींची मालमत्ता बेकायदेशीरपणे बनवल्याचा आरोप आहे. तृणमूल काँग्रेसवर 23 हजार कोटींचा घोटाळा, रोझव्हॅली घोटाळा, शारदा घोटाळा, बकरी घोटाळा, कोळसा तस्करी घोटाळा असे आरोप आहेत. बंगालची जनता हे घोटाळे कधीच विसरू शकत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सांगायचं तर जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध उत्खनन घोटाळा अशी यांची यादीही खूप मोठी आहे. या पक्षाच्या घोटाळ्यांचे मीटर डाऊन होतच नाही. मी तर सांगेन की, भाजपच्या कल्पक कार्यकर्त्यांनी यांच्या घोटाळ्याचे मीटर बनवा. यांच्याकडे घोटाळ्यांचाच अनुभव आहे. यांची कुठली गॅरंटी असेल तर घोटाळ्यांची गॅरंटी आहे. आता देशाला ठरवायचं आहे की, घोटाळ्यांची गॅरंटी देणाऱ्यांना स्वीकारणार का, असे म्हणत पतंप्रधान मोदी यांनी पवारांवर हल्लाबोल केला.
यावेळी विरोधकांना इशारा देत मोदी म्हणाले, त्यांची जर घोटाळ्यांची गॅरंटी असेल तर मोदींचीही एक गॅरंटी आहे, ती म्हणजे प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाईची गॅरंटी. प्रत्येक चोर लुटारूंवर कारवाईची गॅरंटी. ज्यांनी देशाला लुटले, त्यांचा हिशोब तर होणारच आहे. आता जेव्हा कारवाईची भीती वाटत आहे, कायद्याचा दांडा चालत आहे, तुरुंग समोर दिसू लागला आहे तेव्हा ही जुगलबंदी होत आहे. यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध असलेल्या कारवाईतून वाचण्याचा आहे.
तुम्हाला कुणाला कल्याण होताना बघायचं आहे. तुम्हाला गांधी कुटुंबातील मुला-मुलींचा विकास करायचा असेल, तर तुम्ही काँग्रेसला मत द्या. तुम्हाला मुलायमसिंह यादव यांच्या मुलाचं भलं करायचं, तर समाजवादी पक्षाला मत द्या. जर तुम्हाला लालूंच्या कुटुंबातील मुला-मुलींचा विकास करायचा असेल, तर आरजेडीला मत द्या. तुम्हाला शरद पवारांच्या मुलींचं भलं करायचं असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या. तुम्हाला के. चंद्रशेखर राव यांच्या मुलींचं भलं करायचं असेल, तर बीआरएसला मत द्या, पण जर तुम्हाला तुमच्या मुलाचा, मुलीचा, नातंवडांचं कल्याण करायचं असेल, तर भाजपला मत द्या, असे मोदी म्हणाले.