Power equations changed in Pune Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदेत विषय समिती सभापतीपदांच्या निवडीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने चार तालुक्यांना प्रतिनिधित्व देत राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. मावळ, वेल्हे, हवेली आणि इंदापूर या तालुक्यांतील अनुक्रमे दीपाली हुलावळे, अमोल नलावडे, अंकिता पाटील आणि जितेंद्र बढेकर यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
या निवडीनुसार, दीपाली हुलावळे आणि अमोल नलावडे यांच्यापैकी एकाची बांधकाम व आरोग्य समिती सभापतिपदी, तर दुसऱ्याची कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतिपदी निवड जाहीर होणार आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील यांना संधी देण्यात आली आहे, तर समाजकल्याण समितीचे सभापती म्हणून हवेली तालुक्यातील जितेंद्र बढेकर यांची निवड निश्चित झाली आहे. या निवडीमुळे खेड, जुन्नर, शिरूर आणि बारामती या तालुक्यांना ऐनवेळी डावलण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी पाठवलेले बंद पाकीट उघडण्यात आले. त्यामध्ये सभापतिपदांसाठी निश्चित करण्यात आलेली नावे जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, गटनेते श्रीमंत ढोले यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. जाहीर करण्यात आलेल्या नावांवर सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
सभापतीपदासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी अध्यक्षांच्या बंगल्यावरच उमेदवारी अर्ज भरले आणि त्यानंतर जिल्हा परिषदेत पीठासन अधिकारी यशवंत माने यांच्याकडे ते दाखल करण्यात आले. नवीन सभापतींच्या पार्श्वभूमीवर पाहिल्यास, अमोल नलावडे हे वेल्हे तालुक्यातील विंझर गटातून, दीपाली हुलावळे या मावळ तालुक्यातील खडकाळे गटातून, अंकिता पाटील या इंदापूर तालुक्यातील बावडा गटातून, तर जितेंद्र बढेकर हे हवेली तालुक्यातील उरुळीकांचन गटातून निवडून आलेले आहेत.
या प्रक्रियेत एक महत्वाचा ट्विस्ट देखील पाहायला मिळाला. भोर तालुक्यातील विक्रम खुटवड यांना सुरूवातीला सभापतीपदाची संधी देण्यात आली होती आणि त्यांचे नाव अधिकृतपणे जाहीर देखील झाले होते. मात्र त्यांनी स्वतःहून ही संधी नाकारल्याने ऐनवेळी वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, या निवडीपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत काही आजी-माजी आमदारांनी इंदापूर, बारामती आणि पुरंदर या तालुक्यांना सभापतिपद देऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी फेटाळण्यात आली. विशेष म्हणजे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या तालुक्यातील अंकिता पाटील यांना संधी देण्यात आल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अंतिम निर्णय स्वतःच्या अधिकारात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
सभापतीपदासाठी निवड मिळालेल्या तालुक्यांमध्ये मावळ, हवेली, वेल्हे आणि इंदापूर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला ठरवलेल्या संभाव्य सूत्रानुसार खेड आणि जुन्नर या तालुक्यांना संधी मिळण्याची अपेक्षा होती. तसेच बारामतीलाही अंतिम क्षणी संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र या सर्व शक्यता फोल ठरत, ऐनवेळी इंदापूर तालुक्याने बाजी मारत राजकीय समीकरणांना नवे वळण दिले आहे.
