Prajakta Tanpure will join BJP today : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून राहुरीचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात दुपारी तीन वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यानंतर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीकडून त्यांची उमेदवारीही जाहीर होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू होती. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय, त्यानंतर महायुतीशी वाढलेला संवाद आणि बदललेली राज्यातील राजकीय परिस्थिती यामुळे तनपुरे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये अनेक प्रभावशाली नेत्यांनी भाजपची वाट धरली. विशेषतः सहकारी क्षेत्राशी संबंधित विखे, राजळे, पिचड, पाचपुते, कोल्हे यांसारख्या नेत्यांनंतर आता तनपुरे कुटुंबीयही भाजपच्या छत्राखाली येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप नेतृत्व आणि प्राजक्त तनपुरे यांच्यातील चर्चा गेल्या काही काळापासून सुरू होती. विधानसभा निवडणुकीपूर्वीही भाजपकडून त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आल्याचे बोलले जात होते. त्याचवेळी अजित पवार गटाकडूनही त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र त्यावेळी त्यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता.
लाखो शिक्षकांना दिलासा; TET पास होण्यासाठी एक वर्षाची मुदत, मात्र परीक्षा अनिवार्य असल्याचा सुप्रीम कोर्टाचा पुनरुच्चार
राजकीय निरीक्षकांच्या मते, सत्ताधारी पक्षासोबत राहिल्यास विकासकामांना गती मिळते आणि मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावणे सोपे होते. बदललेल्या राजकीय परिस्थितीत हाच विचार पुढे ठेवून तनपुरे यांनी निर्णय घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत असून एक जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे राहुरीच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी गटाशी त्यांची राजकीय सांगड घातली गेल्यास तालुक्याच्या विकासाला चालना मिळू शकते, असा दावा समर्थकांकडून केला जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण जिल्ह्यातील प्रभावी आणि युवा नेतृत्व म्हणून प्राजक्त तनपुरे यांची ओळख राहिली आहे.
दरम्यान, आज दुपारी मुंबईत होणाऱ्या संभाव्य पक्षप्रवेश सोहळ्याकडे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्राजक्त तनपुरे अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करतात का, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होते का आणि या घडामोडींमुळे अहिल्यानगरच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे निर्माण होतात, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र अद्याप पक्षप्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसून दुपारनंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
