वाहतूक व्यवस्थेसह भव्य नियोजन; वाघोलीत यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तयारी पूर्ण

पोलिस प्रशासन तसेच पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून वाहतूक व्यवस्थेसाठी स्वयंसेवक देखील तैनात करण्यात येणार आहेत.

WhatsApp Image 2026 03 14 At 3.47.28 PM

WhatsApp Image 2026 03 14 At 3.47.28 PM

Preparations for this year’s Maharashtra Kesari competition in Wagholi are complete : यंदाची प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे-अहिल्यानगर मार्गावरील वाघोली येथील बाजारतळावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन रामकृष्ण सातव यांनी केले असून आकर्षक बक्षिसांमुळे यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा विशेष चर्चेत आली आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्याला फॉर्च्युनर कार तर उपमहाराष्ट्र केसरीला स्कॉर्पिओसारखी मोठी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून स्पर्धेसंदर्भातील सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे आम्ही दिली आहेत. आयोजनाची माहिती त्यांना आवडली असून 22 तारखेला होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभासाठी स्वतः मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक रामकृष्ण सातव यांनी दिली.

वाघोलीतील बाजारतळावर स्पर्धा होत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पोलिस प्रशासन तसेच पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून वाहतूक व्यवस्थेसाठी स्वयंसेवक देखील तैनात करण्यात येणार आहेत. पार्किंगचीही योग्य व्यवस्था करण्यात आली असून पुणे-अहिल्यानगर मार्गासह पुण्यातील इतर भागातही वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे सातव यांनी सांगितले. स्पर्धा पाहण्यासाठी महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन देखील आयोजकांनी केले आहे. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पारंपरिक कुस्तीचा खेळ पाहण्यासाठी पुण्यातील विविध भागांत जाऊन जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक सादर! कोणत्या विभागाला काय-काय जाणून घ्या…

मागील काही महाराष्ट्र केसरी स्पर्धांमध्ये पंचांच्या निर्णयांबाबत वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र पंच हे मुद्दाम चुकीचे निर्णय देत नाहीत, असे स्पष्ट करत सातव म्हणाले की, हा खेळ अतिशय वेगवान आणि ताकदीचा असल्यामुळे काही वेळा निर्णयात अस्पष्टता दिसू शकते. तरीही यंदा कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी कुस्तीगीर संघटनेकडून अधिक अचूकतेने निर्णय होण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेत तब्बल 840 कुस्तीपटू सहभागी होणार असून त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था वाघोलीतील एका समाजसेवी संस्थेत करण्यात आली आहे. खेळाडूंना महाराष्ट्र केसरीची जर्सी तसेच खुराकाची किट देखील आयोजकांकडून देण्यात येणार आहे.

यावेळी रामकृष्ण सातव यांनी आपल्या कॉलेज जीवनातील कुस्तीच्या आठवणींनाही उजाळा दिला. वाघोली गावातील जवळपास प्रत्येक घरात एक पहिलवान असल्याचे सांगत त्यांनी हिंद केसरी अभिजित कटके यांचे उदाहरण देत या भागातील कुस्ती परंपरेचा गौरवही व्यक्त केला.

Exit mobile version