Purushottam Jagtap paid the price for his rebellion : बारामतीमधील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून बंडखोरी करत भाजपच्या मदतीने स्वतंत्र पॅनल उभे करणारे कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्याविरोधात पक्षाने कारवाई केली आहे. पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी केली.
या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून दूर जात स्वतंत्र पॅनल उभे केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. तालुकाध्यक्ष संदीप बांधलं यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या माजी चेअरमन आणि काही संचालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी तब्बल 83 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत तीन पॅनल आमनेसामने असल्याने चुरस वाढली आहे.
Shivsena Symbol Hearing : शिवसेना कुणाची? ‘या’ दिवशी येणार निकाल; सर्वोच्च न्यायालयाने दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल’ निवडणूक लढवत आहे. या पॅनलचं नेतृत्व सुनेत्रा पवार करत असून, त्याचं निवडणूक चिन्ह कपबशी आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाकडून ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’ निवडणुकीत उतरलं आहे. या पॅनलचं नेतृत्व युगेंद्र पवार करत असून, त्याचं चिन्ह किटली आहे. तर पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या मदतीने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ उभं केलं आहे. या पॅनलचं चिन्ह शिट्टी आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे.
निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने तिन्ही पॅनलच्या सांगता सभांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पॅनलच्या सांगता सभेला विजय शिवतरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. युगेंद्र पवार यांच्या पॅनलच्या सांगता सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तर पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलच्या सांगता सभेला भाजपचे नेते आणि पुरंदर-हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत.
अमेरिकेचा भारतीय IT कंपन्यांना मोठा दणका! 6 कंपन्यांवर कारवाई, भारतीयांचं ग्रीन कार्ड अडकणार?
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक केवळ सहकारी संस्थेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर बारामतीतील राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरत आहे. एका बाजूला सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व, दुसऱ्या बाजूला युगेंद्र पवार यांचं आव्हान आणि तिसरीकडे भाजपच्या पाठिंब्याने मैदानात उतरलेले पुरुषोत्तम जगताप, यामुळे निवडणुकीतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तिन्ही पॅनलचे नेते मतदारांना कोणतं आवाहन करतात आणि या तिरंगी लढतीत बाजी कोण मारतं, याकडे संपूर्ण बारामती तालुक्याचं लक्ष लागलं आहे.
