IMD Ahilyanagar Rain Alert : जिल्ह्यात ६ व ७ ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्यांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे (Pune), नाशिक (Nashik) आणि अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा, प्रवरा, गोदावरी, सीना आणि हंगा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोतुळ येथून मुळा नदीपात्रात विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
वादळी वारा, विजा आणि पावसाच्या वेळी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. झाडाखाली, टॉवर्सजवळ, ध्वज वा वीजखांबाजवळ, ट्रान्सफॉर्मर किंवा धातूच्या कुंपणाजवळ थांबू नये. विजा चमकत असताना घरातच सुरक्षित राहावे. कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये. ट्रॅक्टर, शेती अवजारे, सायकल, मोटारसायकलपासून दूर राहावे. लोंबकळणाऱ्या केबल्सपासून सावध रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आसपास थांबू नये. मोकळ्या जागेत असताना विजा चमकत असल्यास गुडघ्यांवर बसून, हातांनी कान झाकावेत आणि डोके गुडघ्यांमध्ये ठेवून जमिनीशी कमी संपर्क ठेवावा.
धरण परिसरात किंवा नदीच्या प्रवाहात उतरू नये. पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी माल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत माल विक्रीसाठी नेला असल्यास त्याचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. जनावरेही सुरक्षित ठिकाणी हलवावीत व त्यांचे रक्षण होईल, यासाठी तयारी ठेवावी.
एसटी महामंडळ चालवणार राज्य शासनाचे अधिकृत ‘यात्री ॲप’; प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जवळच्या तहसील कार्यालय, पोलीस ठाणे किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. जिल्हाधिकारी कार्यालयातील टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच ०२४१-२३२३८४४ किंवा ०२४१-२३५६९४० या दूरध्वनी क्रमांकांवरही संपर्क करता येईल, असे प्रशासनाने कळवले आहे.