मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण सध्या अत्यंत गलिच्छ पातळीवर आले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियादेखील काहिही दाखवत आहे. हे सर्व बंद झाले पाहिजे. देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राला आज दिशा देण्याची वेळ आली आहे. एवढा महाराष्ट्र रसातळाला चालला आहे. ही परिस्थिती बदलावी म्हणूनच मी मध्यमवर्गीयांना राजकारणात येण्यासाठी सातत्याने आवाहन करत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील राजकारण जर थांबलं नाही तर एक दिवस महाराष्ट्राची अवस्था बिहारसारखी होईल, असा इशाराच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
लोकमान्य सेवा संघ शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला निवडणुका, शिवसेना आणि हिंदुत्व यावर राज ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागले होते.
राज ठाकरे म्हणाले की, १९९५ सालच्या अगोदरचा महाराष्ट्र आणि १९९५ नंतरचा महाराष्ट्र वेगळा आहे. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले राजकारण आणि समाजकारण हे पूर्णपणे बदललेलं आहे. सध्या सारखी परिस्थिती कधीच बघितली नव्हती. राजकारणाचा ऱ्हास खऱ्या अर्थाने १९९५ नंतरच सुरु झाला आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर म्हणूनच मी सातत्याने मध्यमवर्गीयांना राजकारणात घेण्याचे आवाहन करत आहे. अन्यथा महाराष्ट्राची अवस्था बिहार सारखी होईल.
महाराष्ट्रातील एक मोठा मध्यमवर्ग वर्ग राजकारणाच्या बाहेर गेला आहे. त्यामुळे राजकारणात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दुवाच संपला आहे. हा वर्ग येथील परिस्थितीला कंटाळून नोकरी, व्यवसायानिमित्त परदेशात विशेषतः अमेरिका या देशांमध्ये गेला आहे. त्यांनी नक्की काय विचार करून बाहेर पडले आहेत, हे मला माहिती नाही. परंतु, मला असं वाटतं त्यांनी परत यायला हवे. येथील अनेक गोष्टी त्यांनी हातात घ्याव्यात. मी म्हणत नाही की त्यांनी माझ्याच पक्षात यावे. अन्यथा येथील परिस्थिती बिकट होईल. तसेच उत्तर प्रदेश-बिहार या राज्यांपेक्षा महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती वाईट होईल, अशी भिती मला वाटत आहे.