अर्ज मागे घ्या, भविष्याची जबाबदारी आमची; बंडखोर उमेदवारांना महायुतीची ऑफर, रवींद्र चव्हाणांचे मोठे वक्तव्य

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करत निवडणुकीबाबतचा आत्मविश्वास व्यक्त केला.

विधानपरिषद निवडणूक महायुतीची रणनीती जाहीर, विरोधकांवर निशाणा

विधानपरिषद निवडणूक महायुतीची रणनीती जाहीर, विरोधकांवर निशाणा

Ravindra Chavan’s big statement : राज्यात विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या 18 जून रोजी मतदान होणार असल्याने सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महायुतीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करत निवडणुकीबाबतचा आत्मविश्वास व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय असून आम्ही एकजुटीने ही निवडणूक लढवत आहोत. राज्यातील सर्व 17 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ आणि कार्यकर्त्यांची ताकद लक्षात घेता महायुतीला मोठे यश मिळेल, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर काही मतदारसंघांमध्ये पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीचे चित्र समोर आले होते. यावर भाष्य करताना चव्हाण यांनी सांगितले की, वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे आतापर्यंत तीन महत्त्वाच्या ठिकाणची बंडखोरी शमवण्यात यश आले आहे. उर्वरित ठिकाणीही संवाद सुरू असून सर्व मतभेद लवकरच दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खान सरांच्या कोचिंग संस्थेबाहेर अज्ञातांचा गोळीबार, दोन दिवसांत कोचिंग सेंटर उडवून देऊ म्हणत हल्लेखोरांचा धुमाकूळ

4 जून हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याची आठवण करून देत त्यांनी बंडखोर उमेदवारांना पक्षाच्या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन केले. अधिकृत उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून अर्ज मागे घ्यावेत, अशी विनंती त्यांनी केली. तसेच, पक्षाचा आदेश मानून माघार घेणाऱ्या नेत्यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात विविध शासकीय समित्या, महामंडळे तसेच अन्य महत्त्वाच्या पदांवर संधी देताना अशा नेत्यांच्या नावांचा विचार केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले.

महाविकास आघाडीच्या आव्हानावर बोलताना महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचा दावा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुतांश माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी महायुतीच्या संपर्कात असल्याने निवडणुकीत महायुतीला स्पष्ट आघाडी मिळेल, असे त्यांनी सांगितले. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष 4 जूनच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीकडे लागले आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार असून 18 जून रोजी होणाऱ्या मतदानातून कोणाची सरशी होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version