भजनात तल्लीन, समाजजागृतीचा संदेश सुरू आणि अचानक कोसळले; रामधन महाराजांच्या निधनाने बंजारा समाज शोकसागरात

समाजजागृतीचे प्रभावी आवाज म्हणून ओळख असलेले रामधन महाराज राठोड यांचं भजन सुरू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे.

Untitled Design 28

Untitled Design 28

Ramdhan Maharaj Rathod, Passes Away : जालना जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बंजारा समाजाचे प्रसिद्ध प्रबोधनकार, भजनसम्राट आणि समाजजागृतीचे प्रभावी आवाज म्हणून ओळख असलेले रामधन महाराज राठोड यांचं भजन सुरू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण बंजारा समाजावर शोककळा पसरली असून जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. परतूर तालुक्यातील सुरुमगाव तांडा येथे आयोजित धार्मिक आणि समाजप्रबोधनपर कार्यक्रमादरम्यान ही हृदयद्रावक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुमगाव तांडा येथे मोठ्या उत्साहात भजन आणि समाजजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रामधन महाराज राठोड आपल्या खास शैलीत बंजारा भजन सादर करत समाजाला प्रबोधनाचे संदेश देत होते. त्यांच्या आवाजातील ओज, अध्यात्मिक वातावरण आणि समाजजागृतीचे विचार यामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. व्यसनमुक्ती, शिक्षण, समाजातील ऐक्य आणि संस्कृती जपण्याचा संदेश ते आपल्या भजनातून देत होते.

 

भजन रंगात आलेलं असतानाच अचानक रामधन महाराज यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि काही क्षणांतच त्यांना चक्कर येऊन ते व्यासपीठावरच कोसळले. ही घटना पाहताच उपस्थितांमध्ये एकाच खळबळ उडाली. नागरिक आणि आयोजकांनी तात्काळ धाव घेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. प्राथामिक माहितीनुसार हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा तीव्र मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

रामधन महाराज राठोड यांनी अनेक वर्षे बंजारा समाजामध्ये भजन, कीर्तन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृतीचं मोठं कार्य केलं होतं. ग्रामीण भागात जाऊन त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अशिक्षितपणाविरोधात प्रभावीपणे आवाज उठवला होता. त्यामुळे समाजात त्यांना मोठा आदर आणि मान मिळाला होता. विशेष म्हणजे, समाजप्रबोधनाचा संदेश देत असतानाच आणि भजनात तल्लीन अवस्थेत त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत.

शरद पवार शेवटचा डाव टाकणार! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार… पुण्यातल्या गुप्त बैठकीचं गुपित काय?

त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली असून मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिकांनी सुरुमगाव तांड्याकडे धाव घेतली आहे. रामधन महाराज यांच्या निधनाने बंजारा समाजाने एक प्रभावी प्रबोधनकार, लोककलावंत आणि समाजसेवक गमावल्याची भावना व्यक्त होत असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचं बोललं जात आहे.

Exit mobile version