Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil : भिंगार येथे घडलेली दीपक वागस्कर यांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या घटनेमुळे सर्वत्र तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भिंगार येथे भेट देऊन वागस्कर कुटुंबियांचे सांत्वन केले. कुटुंबियांच्या तीव्र भावना लक्षात घेता, या घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
पोलिसांवर कारवाई व SIT चौकशीची मागणी
या प्रकरणात स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी पीडित कुटुंबाला आधार देण्याचे काम केले आहे. कुटुंबियांच्या मागणीनुसार दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून याप्रकरणातील संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. कुटुंबियांच्या SIT (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्याच्या मागणीबाबत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.
पोलीस प्रशासनाला संवेदनशीलतेचा सल्ला
भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागोपाठ घडणाऱ्या घटनांवर बोलताना विखे पाटील म्हणाले, “एका 24-25 वर्षांच्या तरुण मुलाचा असा दुर्दैवी अंत होणे हे अत्यंत वेदनादायी आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस दल नेहमीच उत्तम काम करते, परंतु अशा प्रकारांमुळे पोलिसांचे नीतिमत्ता व मनोबल खचू नये अशा संवेदनशील प्रकरणात पोलीस प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज आहे.
एसआयआर प्रकरणानंतर मोठी राजकीय घडामोड, ज्ञानेश कुमारांविरोधात ‘महाभियोग’ प्रस्तावाची तयारी
राजकारण्यांवर आणि विरोधकांवर निशाणा
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मंत्री विखे पाटील म्हणाले, “दुष्काळ किंवा अशा दुर्दैवी घटनांवर राजकारण करण्यापेक्षा आपण जनतेच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्वतः शेताच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविडच्या काळात जेव्हा जनता उद्ध्वस्त झाली होती तेव्हा काय उपाययोजना केल्या होत्या, याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे.
डिंभे-माणिकडोह प्रकल्पाबाबत स्पष्टीकरण
डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या स्थगितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, “या कामावर कोणतीही स्थगिती आलेली नाही. केवळ कामाच्या लेव्हलबाबत (पातळीबाबत) काही मुद्दे उपस्थित झाले असून त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. हा प्रकल्प अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार असून जलसंपदा मंत्री म्हणून हे काम पूर्ण करणे ही माझी जबाबदारी आहे. तसेच, भिंगार पोलीस ठाण्यातील तक्रारींची दखल घेऊन तेथे सक्षम व अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून संपूर्ण पुनर्रचना केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी शेवटी दिले.
