Rohit Pawar Criticize BJP On Nilesh Ghaiwal : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. निलेश घायवळ या गुंडाच्या प्रकरणावरून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री राम शिंदे, तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. भाजप आज गुंडाच्या समर्थनात मैदानात उतरलं आहे, असा घणाघात करत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांवरही प्रश्न उपस्थित केले. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आरोपांना देखील उत्तर दिलंय.
‘अभ्यास न करता घेतली पत्रकार परिषद’
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, सिद्धार्थ शिरोळे हे अभ्यासू आमदार आहेत. पण यावेळी त्यांच्या नेत्यांनी त्यांना काही कागद दिले आणि वाचायला सांगितले. त्यांनी अभ्यास न करता पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे त्यांना प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. गुंडाच्या ( Nilesh Ghaiwal) समर्थनात भाजप मैदानात उतरलं आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. निलेश घायवळ याला पासपोर्ट मिळाल्याचं प्रकरण महाविकास आघाडीच्या काळात झालं, असं भाजप (BJP) सांगत आहे. पण नगर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट म्हटलं आहे की, संबंधित पत्त्यावर निलेश घायवळ आढळला नाही. हा अहवाल पासपोर्ट कार्यालयाला पाठवण्यात आला, आणि ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं. मग 2014 पासून केंद्रात भाजपचं सरकार असूनही हा पासपोर्ट कसा मिळाला?
घायवळला सरकारचं पाठबळ
पवारांनी प्रश्न केला की, 2017 मध्ये गृहखातं कोणाकडे होतं? तेव्हा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री राम शिंदे होते. त्यावेळी पोलिस विभागाला पुरावे देता आले नाहीत, म्हणून कोर्टाने निलेश घायवळ याला निर्दोष मुक्तता दिली. भाजपने त्यावेळीच त्याला मदत करण्यास सुरुवात केली. आमच्याकडे अनेक फोटो आणि व्हिडिओ आहेत. भाजप नेते निलेश घायवळ याला मंत्रालयात घेऊन गेले होते. हेच त्याचं समर्थन असल्याचं स्पष्ट पुरावा आहे. माझ्या आईचे फोटो दाखवून तुम्ही काय सिद्ध करताय? तुमच्या काळात हा मंत्रालयात फिरत होता म्हणजे त्याला सरकारचं पाठबळ होतं. राम शिंदे यांनीच या गुंडाला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी मदत केली. याची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
पुण्यात वाढता गुन्हेगारी दर
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, पुण्यात क्राईम रेट वाढत आहे. या शहराचं वाटोळं या तीन नेत्यांनी केलं आहे. रवींद्र धंगेकर यांनी हा विषय पुढे आणला, पण भाजप नेत्यांनी त्यांना झापलं. रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांच्या कुटुंबाला सरकारने सुरक्षा द्यावी. जर त्यांच्या केसाला धक्का लागला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर असेल. पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेचा व्हिडिओ दाखवला, ज्यात फडणवीस सचिन घायवळ याचं नाव घेताना दिसत आहेत. गुंडाला सहजपणे पासपोर्ट कसा मिळाला? ‘समृद्धी’ नावाची घावयळ याची कंपनी आहे. या लोकांनी धमकावून कामे मिळवली आहेत, जमिनी बळकावल्या आहेत, असा दावा पवारांनी केला.
पवनचक्कीचं मोठं रॅकेट
या सगळ्याच्या मागे सत्ताधाऱ्यांचं पाठबळ आहे. तानाजी सावंत यांचे पुतणे निलेश घायवळ याचे पार्टनर आहेत. राम शिंदे यांनी यांना मदत केली आहे. समीर पाटील यांचेही याच्याशी संबंध आहेत. धनंजय सावंत या गुंडासोबत काम करतात, आणि पवनचक्कीचं मोठं रॅकेट यात आहे. आमचं घर काचेचं आहे, ED, CID, आयकर विभाग सगळ्यांनी तपासलं आहे. पण जे लोक काचेच्या घरात राहतात, त्यांनी दगड फेकू नयेत, असं म्हणत रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
ते मोठे नेते आहेत, पण पालकमंत्री असूनही पुण्यात आयुक्त, SP, CP बसवता येत नाहीत, त्यामुळेच ते नाराज असावेत,” अशी टोलेबाजी त्यांनी केली.
सिद्धार्थ शिरोळेंचे मविआवर आरोप
आज पुण्यातील भाजपा कार्यालयात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गुंड निलेश घायवळला मविआ सरकारने फेक डॉक्युमेंटच्या आधारावर पासपोर्ट दिला, असा आरोप केला. या पासपोर्टमुळे घायवळ पळाला आणि त्याचे खापर मात्र महायुती सरकारवर फोडण्यात येऊ लागले आहे . मविआ सरकारमध्ये तेव्हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोण होते, त्यात यांचा किती सहभाग होता, या प्रकाराची चौकशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली . या चौकशीनंतर सारे सत्य बाहेर येईल, असाही विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला.