Rohit Pawar’s telling warning to BJP’s allies : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली असून, सत्ताधारी आघाडीतच अंतर्गत तणाव असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका सडेतोड पोस्टमुळे हा वाद अधिक चिघळला आहे. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप करत विरोधकांचे आमदार-खासदार फोडण्याच्या बातम्या येत असल्या, तरी प्रत्यक्षात सत्तेतल्या मित्रपक्षांनाच लक्ष केलं जाणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत सत्ताधारी मोठ्या पक्षाकडून त्यांच्या सहयोगी पक्षांमध्येच राजकीय हालचाली होण्याची पक्की माहिती असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. या विधानामुळे राज्यातील महायुतीत खळबळ उडाली आहे. याचबरोबबर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या तथाकथित भोंदू बाबा खरात प्रकरणाचा देखील त्यांनी उल्लेख केला. हे प्रकरण अचानक समोर आलेले नसून, ठरवून बाहेर काढण्यात आले आहे आणि ही फक्त सुरूवात आहे, असा सूचक आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणामागे राजकीय हेतू असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर उपरोधिक भाष्य करत, सध्या मित्रपक्षांप्रती ए दोस्ती हं नाही छोडेंगे, अशी भूमिका घेतली जात असली, तरी भविष्यात हीच नाती ताणली जाऊन जा बेवफा जा, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा देखील त्यांनी दिला. यामुळे सत्ताधारी आघाडीत अतिविश्वास वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खरंच सत्ताधारी पक्ष आपल्या मित्रपक्षांवरच डोळा ठेऊन आहे का? भोंदू बाबा खरात प्रकरणामागे राजकीय डावपेच आहेत का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, आगामी काळात महायुतीतील संबंधांवर याचा काय परिणाम होणार?
दरम्यान, सत्ताधारी पक्षाकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या पोस्टमुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्याची संधी साधली आहे, तर सत्ताधारी गटातील मित्रपक्ष मात्र सावध पवित्रा घेत असल्याचं चित्र आहे. एकूणच, रोहित पवार यांच्या या पोस्टने केवळ भोंदू बाबा खरात प्रकरणालाच नवं वळण दिलं नाही, तर सत्ताधारी आघाडीतल्या नातेसंबंधावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पुढील काही आठवड्यांत या घडामोडींना कोणतं वळणं मिळतं, याकडे संपूर्ण राज्यच लक्ष लागलं आहे.
