Download App

छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका, संभाजीराजेंच्या पत्नी पुजाऱ्यावर भडकल्या

नाशिक : गुरूवारी देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी या उत्सवाला दालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. तर त्याचवेळी नाशिकमध्ये काळाराम मंदीरामध्ये मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूरच्या गादीचे वंशज आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांच्याबाबतीत एक अनुचित प्रकार घडल्याचं पाहायला मिळाला. याबद्दल स्वतः संयोगीताराजे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली.

संयोगीताराजे छत्रपती यांना नाशिकमध्ये काळाराम मंदीरामध्ये पूजा करण्यासाठी गेल्या असता. त्यांना तेथील पुजाऱ्यांनी वेदोक्त मंत्रांचं पठण करण्यापासून रोखले. त्यावर त्यांनी तेथे संबंधितांना समज देत वेदोक्त मंत्रांसह पूजा केली. मात्र त्यांनी त्यांच्यासोबत अशा प्रकारे झालेल्या या भेदभावा बद्दल नाराजी व्यक्त करत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली आहे.

काय आहे संयोगीताराजे छत्रपती यांची इन्स्टाग्राम पोस्ट ?
‘हे श्रीरामा, स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे… हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे.. आपण सर्वजण देवाची लेकरे….आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी?

या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते. त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले. नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला.

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले.

रमजानमध्ये उपवास खजुरांनी का सोडतात? जाणून घ्या आरोग्य तज्ज्ञांचे मत…

त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे…अजूनही खूप प्रवास बाकी आहे…अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे!’

Tags

follow us