औरंगाबाद: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती असल्याने सर्वत्र त्यांची जयंती साजरी केली जात आहे. मात्र याचवेळी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांच्या हाताने बाळासाहेबांच्या तेल चित्रांच्या अनावरण होत असून याचे माझा आजोबाला दुःख वाटत असेल, असे वक्तव्य काल आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेत केले होते. याला आता पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भुमरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांना दुःख होत असेल की, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना देखील आपल्या मुलाने, नातवाने आपल्या तैलचित्राचे अनावरण केले नाही. तसेच बाळासाहेब ठाकरे यांना अभिमान वाटत असेल की आपल्यातील चित्राचे अनावरण एक सामान्य कट्टर शिवसैनिक करत आहे. असे म्हणत पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना जोरदार टोला लगावला आहे.
संभाजीनगरमधील रांजनगाव शेणपुंजी येथे काल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट चषकाचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून मिंधे गटावर निशाणा साधला आहे.
राज्यामध्ये ओके नाही, पण ते बसले आहे, ओके होऊन. कुणी 50 खोके घेतले आहेत. तर कुणी 9 लायसन्स मागवले आहेत. हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावण्यात आला आहे. जे अनावरण करणार आहेत, ते घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या मनात भीतीची आणि गद्दारीची भावना आहे. ती त्यांच्या मनातून निघून जावी. कशाची भीती होती माहित नाही. कुणाकडून लपवायचं होतं माहित नाही. पण एवढं काही खाल्लं होतं की, ते अपचन होत आहे. ते लपवायला यांना गुवाहटीला जावं लागत. या हातांनी ते हे अनावरण करणार आहेत. माझे आजोबाही विचार करत असतील, काय हे गद्दार लोकं माझ्या तैलचित्राचं अनावरण करत आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी काल मिंधे गटाला लगावला होता.