Sanjay Raut On Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार राजकारणातून निवृत्ती जाहीर करणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएत जाणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. शरद पवार राजकारणातून निवृत्ती जाहीर करणार का? याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे शरद पवार कुठेही जाणार नाही असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवार कुठेही जाणार नाही. ते इंडिया आघाडीत राहणार आहेत आणि फुले, शाहू आणि आंबेडकरांचा विचार शरद पवार सोडणार नाही असा दावा देखील संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांचं संपूर्ण राजकारण धर्मांध शक्तींविरुद्ध लढण्यात आणि काम करण्यातं गेलं आहे. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे. त्यांच्या कुटुंबातील आणि पक्षातील वारसदारांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. पण सत्तेत जाण्याची काही लोकांना घाई झाली असेल आणि सत्तेसाठी विचार गुंडाळला जात असेल तर ते योग्य नाही. त्यामुळे पवारांचा विचार प्रवाह गढूळ होईल पवार अशी भूमिका घेतील असं वाटत नाही. प्रत्येक राजकीय पक्षात दोन प्रवाह असतात. त्यांच्या पक्षात देखील दोन प्रवाह असणार असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही आता आराम करा,तुमचा पक्ष फोडून आम्ही तुम्हाला घरी बसवलं आहे असंच मोदींना म्हणायचं आहे. अडचणीच्या काळात पवारांनी तुम्हाला मदत केली. संरक्षण दिलं आणि तुम्ही त्यांचा पक्ष फोडला. घर फोडलं. बाळासाहेब ठाकरेंनी मोदींचं मुख्यमंत्रीपद वाचवलं, शाहांना तुरुंगात जाण्यापासून वाचवलं पण भाजपने त्यांचाच पक्ष फोडला असं यावेळी संजय राऊत म्हणाले.
शरद पवार निवृत्ती जाहीर करणार का? सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया –
पवार डिलीमिटेशन विधेयकाला पाठिंबा देतील ?
तर शरद पवार डिलीमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधेयकाला पाठिंबा द्यायचा आणि एनडीएत जायचं नाही असं होत नाही. बाहेरुन पाठिंबा दिल्याने मुलं होत नाहीत. लग्न करावं लागतं किंवा घटस्फोट होतो असं यावेळी राऊत म्हणाले. तसेच इंडिया आघाडी डिलीमिटेशन बिलावर जे निर्णय घेईल तो आम्हाला बंधनकारक असणार आहे असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
