Download App

Sanjay Raut : “राजकारणाचं वारं कानात गेलं की दुखतं”

Sanjay Raut On Devendra Fadanvis :   शिवसेनेच्या वतीने काल सर्व वृत्तपत्रांमध्ये ‘राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर फडणवीसांनी काल आपला कोल्हापूरचा दौरादेखील रद्द केला होता. यावर शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी फडणवीसांचा कान दुखत असल्याने ते हेलकॉप्टरने प्रवास करणार नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आपल्या शैलीत टोला लगावला आहे.

फडणवीसांचा कान दुखतोय हे खरं आहे. महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वारं वाहतं आहे ते वारं जर कानात गेलं तर कान दुखू शकतो. मला देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी पूर्ण आदर आणि सहानुभूती आहे.  105 आमदारांच्या नेत्याचं ज्याप्रकारे 40 जणांनी मातेरं आणि पोतेरं केलेलं आहे, त्यामुळे कान दुखणार होता. तसेच आणखीही काही दुखू शकतं. पोटात दुखू शकतं, छातीत दुखू शकतं,  या सरकारला हार्टअटॅक येऊ शकतो. त्यामुळे त्यांची प्रकृती बरी नसेल, ते नाराज असतील तर त्यांची नाराजी समजून घेतली पाहिजे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

Shivsena Advertisement : शिवसेनेने कालची चूक सुधारली! फडणवीस अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापून सारवासारव

तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील टोला लगावला आहे. कालच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे तसेच देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नव्हता. यानंतर फडणवीसांच्या दबावामुळे त्यांना आज जाहिरात बदलावी लागली. भाजप आणि शिवसेनेत सारं काही अलबेल नाही, असे राऊत म्हणाले.

Shivsena Advertisement : अखेर शिंदे भाजपसमोर नमलेच! आजच्या जाहिरातीत शिंदे-फडणवीसांना जनतेचा आशिर्वाद…

दरम्यान, आज बदललेल्या जाहिरातीवरुन इजा ‘कानाला’ झालेली नव्हती तर ‘मनाला’ झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती.

Tags

follow us