Sanjay Raut’s criticism of Prime Minister Modi : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे. मुंबईतील मिठी नदी येथील नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची सूचना करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय. राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे स्वतःला मोठे वैज्ञानिक आणि संशोधक असल्याचे सांगतात. त्यांनी काही वर्षांपूर्वी नाल्यातून गॅस निर्माण करता येतो असा दावा केला होता. त्यामुळे मुंबईतील मिठी नदीच्या किनाऱ्यावर अशा प्रकारचा प्रकल्प उभारण्याची कल्पना सरकारने प्रत्यक्षात आणावी.
या प्रकल्पाचे उदघाटन स्वतः पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करावे आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबईच्या महापौर यांनी त्यांना निमंत्रण द्यावे, अशी उपरोधिक मागणी देखील त्यांनी केली. या प्रकल्पातून प्रेरणा घेऊन देशभरात असे उद्योग उभे राहू शकतात, असा टोला राऊतांनी लगावला आहे. दरम्यान, आखाती प्रदेशातील वाढत्या तणावाचा परिणाम देशातही जाणवू लागल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः इराण, अमेरिका आणि इस्त्राईल यांच्यातील संघर्षामुळे मध्य पूर्वेतून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले असून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याचं चित्र आहे. केंद्र सरकारने ५ मार्च रोजी अधिसूचना काढत व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅसवर काही निर्बंध लागू केले आहेत. त्याचा परिणाम मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये दिसून येत आहे. गॅस सिलेंडर मिळण्यास विलंब होत असल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी देखील भीतीपोटी गॅस एजन्सीसमोर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.
या पार्श्वभूमीवर राऊत यांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधला. आखाती देशांमधील युद्धामुळे निर्माण झालेली गॅस टंचाई पंतप्रधान मोदी यांच्या कल्पनेतून दूर करता येईल, असा टोला त्यांनी लगावला. मात्र त्यासाठी पहिला प्रकल्प मुंबईतील मिठी नदीवर उभारण्यात यावा. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाईपची व्यवस्था आम्ही करायला तयार आहोत. तसेच या प्रकल्पासाठी कोणतेही अनुदान आवध्यक असल्यास ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करावे, अशी उपरोधिक मागणी देखील त्यांनी केली.
राऊत यांनी यावेळी सरकारच्या आधीच्या आश्वासनांवर देखील प्रशचिन्ह उपस्थित केले. युद्धाचा देशातील ऊर्जा पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात गॅसची टंचाई जाणवू लागली असून त्याचा परिणाम उद्योग आणि व्यवसायांवर होत असल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईसारख्या महानगरात गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टोरंटस आणि हॉटेल्स अडचणीत आली आहेत. व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने काही ठिकाणी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
तसेच वाहन उद्योगावर देखील याचा परिणाम होत असल्याचे राऊत यांनी म्हटले. सातारा आणि सांगली येथील काही अभियांत्रिकी उद्योग बंद पडल्याचा आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहन उद्योग देखील अडचणीत आल्याचा दावा त्यांनी केला. एकूणच, वाढती गॅस टंचाई, उद्योगांवर होणार परिणाम आणि सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
