Sanjay Raut’s serious allegations against Ravindra Chavan : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने केलेल्या मोठ्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तब्बल 5 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या सोने तस्करी प्रकरणात भाजप कामगार संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकाने मुंबई विमानतळावर पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. या कारवाईदरम्यान 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तस्करीमागे कोणते आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत आहे का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित अजित आचरेकर यांची ओळख भाजप कामगार संघटनेचे चिटणीस म्हणून समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांचा पक्षप्रवेश झाला होता आणि त्यानंतर त्यांच्याकडे कामगार संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
महागाई नियंत्रणात नाही, जनतेची लूट सुरू, एलपीजी दरवाढीवर शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक फोटो शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कोकणातील निवडणुकांमध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचा आरोप केला. तसेच मुंबई विमानतळावरील कामगार संघटनांमध्ये हस्तक्षेप करून काही व्यक्तींना प्रोत्साहन देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, डीआरआयने अटक केलेल्या व्यक्तींचे संबंध भाजप नेतृत्वाशी असल्याचे फोटोमधून दिसत असून या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही केली आहे.
मात्र, संजय राऊत यांनी केलेले हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. या संपूर्ण प्रकरणावर भाजप किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आता भाजपकडून या आरोपांना काय उत्तर दिले जाते आणि तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मुंबई विमानतळावरील 5 कोटींच्या सोने तस्करी प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. डीआरआयचा तपास पुढे कोणते धागेदोरे उलगडतो आणि संजय राऊतांच्या आरोपांवर भाजप काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
