औरंगाबाद : महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे सभा होत असल्यानेच मला टार्गेट केले जात आहे. माझ्याविरोधात आंदोलन, तक्रार करण्यासाठी मातोश्रीवरून आदेश दिले जात आहे. मी खालच्या पातळीवर काही बोललोच नाही. हे जर थांबले नाही तर मी तुम्हाला कपडे काढून फिरायला लावीन, असा इशारा उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी दिला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर संजय शिरसाठ यांनी वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. संजय शिरसाठ यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच सुषमा अंधारे यांनी लातूर पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिली आहे. त्यावर पत्रकार परिषद घेत संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केली आहे.
संजय शिरसाठ म्हणाले की, सुषमा अंधारे यांच्यासारखं कलाकार मी पाहिला नाही. लढायचं असेल तर समोर येऊन लढा. मागून वार करू नका. संजय शिरसाठ पोटासाठी राजकारण करत नाही. सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाकडे खरंच तक्रार करावी. मग महाराष्ट्रातील जनतेला तरी कळेल की मी काय वाईट बोलले आहे. सुषमा अंधारे या कधीही एका पक्षात राहिल्या आहे का, आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची त्या वाट लावत आहेत. काही दिवसानंतर त्यांचं अस्तित्व देखील राहणार नाही.
मी सुषमा अंधारे यांच्याविरोधात कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे सभा होत आहे. मी स्थानिक आमदार असल्याने माझ्या विरोधात मुद्दाम षडयंत्र रचण्यात येत आहे. त्यामुळे माझ्याविरोधात आंदोलन, तक्रार करण्यासाठी थेट मुंबईतील मातोश्रीवरून दबाव आणला जात आहे. हे जर थांबले नाही तर मी तुमचे कपडे काढून फिरायला लावेन, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनाच संजय शिरसाठ यांनी दिला आहे.
(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube