“लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याचे जवळपास निश्चित होते. पण, मोठे महाराज उमेदवार असतील तर माझा प्रश्नच येत नाही. शाहू महाराज हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. माझ्या निवडणुकीत 100 टक्के काम केले असते आता महाराज यांच्या प्रचारात एक हजार टक्के काम करणार आहे. वडील माझे सर्वस्व आहेत. जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार आहोत. निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आमचे काम थांबणार नाही. कष्ट करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. स्वराज्य संघटनाही कुठेही निवडणुकीत उभी राहणार नाही… असे म्हणत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरच्या मैदानातून माघार घेतली आहे.”
आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसकडून उमेदवार असणार आहेत. मागील काही दिवसांपासून शाहू महाराजांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत आले होते. तेव्हापासूनच संभाजीराजेंचे नाव मागे पडणार हे निश्चित झाले होते. कारण वडिलांच्या विरोधात संभाजीराजे उमेदवारी करणार नाहीत, राजघराण्यात मतभेद होतील असा निर्णय ते घेणार नाहीत. शिवाय शाहू महाराज जर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर ते अन्य मतदारसंघातही उमेदवारी देणार नाहीत, असे मानले जात होते. झालेही तसेच.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यात त्यांनी सतेज पाटील आणि बाळासाहेब थोरात यांची भेट घेवून शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर पवारांनी तिथूनच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना फोन लावला आणि कोल्हापूरमधून शाहू महाराज हेच उमेदवार असणार याबाबत कल्पना दिली. ठाकरे गटाकडूनही या निर्णयाला होकार देत कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा आपल्या पारड्यात पाडून घेतली.
मात्र या सगळ्या घडामोडींमुळे लोकसभेसाठी इच्छुक असलेले संभाजीराजे छत्रपती यांचा पवार-ठाकरे यांनी मिळून त्यांचा गेम केला का? त्यांच्या स्वराज्य संघटनेचा विस्तार राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून रोखला आहे का? असे सवाल विचारले जात आहेत.
दोन वर्षांपूर्वी राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सहाव्या जागेवर अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यावेळी भाजप दोन आणि महाविकास आघाडीच्या चार जागा निवडून येतील असे संख्याबळ होते. यात महाविकास आघाडीतीन तीन पक्ष तीन जागा लढवणार होते. तर चौथ्या जागेवर शिवसेनेने दावा केला होता. मात्र या जागेवरुन आपल्याला राज्यसभेत पाठवावे अशी संभाजीराजे यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी शिवसेनेसोबत चर्चा सुरु केली. मात्र त्यांना पक्षात प्रवेश करण्याची अट टाकण्यात आली. इथूनच त्यांचे आणि शिवसेनेचे बिनसले.
संभाजीराजेंनी शिवसेनेच्या ऑफरला कोणताच प्रतिसाद दिला नाही. वाट बघून शिवसेनेने कोल्हापूरच्याच संजय पवार यांना मैदानात उतरविले. त्यानंतर घोडेबाजारसाठी माझी उमेदवारी नाही. माझे निष्कलंक व्यक्तिमत्व आहे. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे म्हणत संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आणि स्वराज्य संघटनेची स्थापना केली. मात्र ते जर उमेदवार असते तर भाजपने सातवा उमेदवार दिला नसता, संभाजीराजेंना पाडण्याचा डाव भाजपने खेळला नसता असे ठाकरेंचे मत होते.
पण संभाजीराजे यांनी ठाकरेंची ऑफर धुडावली आणि स्वतःही अपक्ष मैदानातून माघार घेतली. त्यानंतर भाजपने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. भाजपने महाविकास आघाडीची काही मते फोडत महाडिक यांना निवडून आणले. पवार यांच्या पराभवाने ठाकरे कमालीचे दुखावले गेले. त्यानंतर महाविकास आघाडीतील दुफळीही समोर आली. शिंदे यांनी बंड केले आणि महाविकास आघाडीचे सरकार विसर्जित झाले.
इकडे संभाजीराजे दोन वर्षांपासून याच स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करत आहेत. कार्यकर्ते तयार करत आहेत. निवडणुकीसाठी संघटनेची बांधणी करत आहेत. मराठा आरक्षण, गडकोट किल्ले संवर्धन या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणूकही स्वराज्यमधूनच लढवणार असे घोषित केले होते. पण जर कोणाचा युती, आघाडीचा प्रस्ताव आला तर नक्की करु असे सांगितले. त्यानंतर त्यांनी 2009 मधील पराभावाची जखम विसरलेलो नाही असे सांगत कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात उडी घेतली.
मात्र स्वराज्य संघटनेच्या या विस्तारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपारिक आणि अठरा पगड जातीतील मतदार थोड्या फार प्रमाणात का होईना पण विभागला जाण्याची शक्यता होती. तसे झाले असते तर महाविकास आघाडीचा उमेदवार किमान पराभूत होण्यास हातभार लागला असता. हीच सगळी समीकरणे डोक्यात ठेवून पवार यांनी शाहू महाराज छत्रपती यांचे नाव लोकसभेसाठी पुढे करुन मतांमधील महाराष्ट्रातील संभाव्य फूट रोखली तर ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वीचा बदला घेतला का? असा सवाल विचारला जात आहे