Download App

Sharad Pawar : ‘सरकार बदलण्याचा देशाचा मूड’; शरद पवारांचं मोठं विधान

  • Written By: Last Updated:

बारामती : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात आणि महाराष्ट्रातही कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक निकालांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये एकीकडे भाजपनं जागा राखली असताना दुसरीकडे काँग्रेस-महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. तब्बल २८ वर्षांनंतर भाजपचा (BJP) बालेकिल्ला ठरलेल्या कसब्यात काँग्रेसनं झेंडा फडकवला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानल्या जातो आहे. अशाचत आता या दोन्ही निवडणुकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. सरकार बदलण्याचा देशाचा मुड असल्याचं ते म्हणाले.

शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोटनिवडणुकीवर शरद पवारांनी भाष्य केलं. नुकत्याच झालेल्या त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय विधानसभा निवडणुकांत यश मिळाल्याचा दावा करत भाजपकडून जल्लोष करण्यात येत आहे. मात्र, शरद पवार यांनी देशभरात बदलाचे वारे आहे, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला.

ते म्हणाले, ‘मला वाटते की, आता देशात बदलाचे वातावरण तयार होत असून देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे. अलीकडेच महाराष्ट्रात पदवीधर आणि शिक्षक संस्था मतदारसंघासह इतर तीनचार निवडणुका झाल्या. त्या निवडणुका काय सांगतात? जवळपास सगळीकडे भाजपला एखाद दुसरी जागा सोडली तर यश मिळाले नाही. या निवडणुकांचे निकाल हेच सांगत आहेत. सरकार त्यांचं, सत्तेच्या वापर त्यांचा हे या निवडणुकीत दिसून आले. तरीही भाजपला यश मिळालं नाही, असं त्यांनी सांगितलं.

पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही. ते जगजाहीर आहे, त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही, मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे, असं शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी देशात कोण-कोणत्या राज्यांत भाजप नाही, याची यादीच दिली. पवार म्हणाले, आंध्र प्रदेशात भाजप नाही. त्यानंतर पंजाबमध्ये भाजप नाही. दिल्लीत भाजप नाही. हिमाचल प्रदेशातही भाजप नाही. ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगाल यांच्या राज्यात भाजप नाही. केरळ, तामिळनाडूमध्ये आज भाजप नाही. पुढे येण्याची शक्यताही नाही. कर्नाटकात पूर्वी काँग्रेसची सत्ता होती. पण तेथेही आमदार फोडून भाजपने सत्ता स्थापन केली. उद्या निवडणुका होतील तेव्हा लोक विचार करतील, असं ते म्हणाले.

Bill Gates : कोरोना काळात भारताने अभूतपूर्व काम केले, मोदींसोबत भेटीत बिल गेट्स यांचे गौरवोद्गार

दरम्यान, पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीबद्दल मी माहिती घेतली. त्याच्यामध्ये भाजपला दोन ठिकाणी अधिक मते मिळाली आहेत. नाहीतर सरसकट सगळीकडे भाजप मागे आहे. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ अशा बहुसंख्य ठिकाणी रवींद्र धंगेकरांना जास्तीची मतं मिळाली. हा बदल आहे. हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ लोक वेगळ्या विचारात आहेत हे स्पष्ट होतंय, असा इशारा पवारांनी दिला.

Tags

follow us

वेब स्टोरीज